कणकवली : भाजप आणि संघ यांच्या जुन्या लोकांना सांगतो की, ज्या हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलो होतो, ते हिंदुत्व, संस्कार मी अजूनही सोडलेले नाहीत.आपण एकत्र आलो ते हिंदुत्व सध्याच्या नेतृत्वाकडे नाही. सध्याचे नेतृत्व केवळ सगळे हडप करण्याच्या वृत्तीचे आहे. हे हुकूमशाहीचे संकट केवळ आमच्यावर नाही, तर तुमच्यावरही आहे. त्यामुळे सावध व्हा, असे विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित झालेल्या सभेत केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ‘इंडि’ आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,
१. अमित शहा यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे. श्रीराममंदिर बांधले हे चांगलेच झाले; पण बाबरी पाडली याचे दायित्व घ्यायला ते सिद्ध नव्हते. हिंदुत्वावर बोलण्याचे आव्हान देणार्यांनी शंकराचार्यांना न घेता भ्रष्टाचार्यांना घेऊन श्रीराममंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. यांचे हिंदुत्व गोमूत्रधारी आहे, तर आमचे हिंदुत्व सुधारणावादी आहे.
२. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या राजकीय हत्या कुणी केल्या याचा शोध का घेतला नाही ? महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेले, मग कोकण उद्ध्वस्त करणारे बारसु, नाणार आणि जैतापूर हे विनाशकारी प्रकल्प कोकणात का ? ‘इंडि’ आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातमध्ये नेले, ते पुन्हा आणू.
(सौजन्य : AWAAZ INDIA TV)
३. शेतकर्यांना प्रतिवर्षी ६ सहस्र रुपये दिले जातात; मात्र शेतकर्याला लागणारे बी-बीयाणे, अवजारे, खते यांवर कर लावून त्यांची लूट करतात. आमची सत्ता आली की, शेतकर्यांना लागणार्या आवश्यक गोष्टींवरील कर रहित केला जाईल. जी.एस्.टी. करप्रणालीत पालट केला जाईल. महाराष्ट्रात युती सरकारच्या वेळी जीवनावश्यक ५ वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, तसेच ‘इंडि’ आघाडीचे सरकार आल्यावर पुन्हा जीवनावश्यक ५ वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी विनायक राऊत यांना मोठ्या मतांनी विजयी करा.