कळंबा कारागृहात ‘भ्रमणभाष’ आढळल्याच्या प्रकरणी २ अधिकारी आणि ९ कर्मचारी सेवेतून बडतर्फ !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – कळंबा कारागृहात मध्यंतरी ५० हून अधिक भ्रमणभाष आढळले होते. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीत दोषी आढळलेले दोन वरिष्ठ अधिकारी सोमनाथ मस्के आणि सतीश कदम, तसेच ९ कर्मचारी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अपर पोलीस महासंचालक (कारागृह प्रशासन) अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. याच समवेत कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांचे येरवडा येथे, तर उपअधीक्षक साहेबराव आडे यांचे सोलापूर कारागृहात स्थानांतर करण्यात आले आहे.

कळंबा कारागृहात भ्रमणभाष, सीमकार्ड, बॅटरी सापडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यांसह कारागृहात बंदीवानांमध्ये भांडणे, मारामारी असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कळंबा कारागृहातील सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते ! या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी पुण्याहून कारागृहात आलेल्या पथकाने विशेष मोहीम राबवून जवळपास ५० हून अधिक भ्रमणभाष, सीमकार्ड, बॅटरी, पेनड्राईव्ह जप्त केले. चारही बाजूने भिंती आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त असलेल्या कारागृहात इतक्या मोठ्या प्रमाणात या वस्तू सापडल्याने वरिष्ठ पातळीवर चौकशी समिती नेमण्यात आली. यात २ अधिकारी आणि ९ कर्मचारी दोषी आढळले. (जेथे बंदीवान सुधारण्यासाठी येतात, तेथेच जर त्यांना भ्रमणभाष आणि अन्य सुविधा देण्यात येत असतील, तर ते सुधारतील कसे ? आणि कोल्हापूरच्या कारागृहाची पडताळणी करण्यासाठी पुणे येथून पथक येते, यापेक्षा लज्जास्पद अन्य काही असू शकते का ? – संपादक)

या प्रकरणी आमचा दोष नसून आम्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणकडे (मॅटकडे) दाद मागणार असल्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांगितले.