आदित्य बिर्ला समुहाने बॉक्साईट हाताळणी महाराष्ट्रात हालवल्याने मुरगाव (गोवा) बंदराला मोठा फटका !

संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप करण्याची बार्जमालक संघटनेची मागणी

(बार्ज म्हणजे विशिष्ट आकाराची खनिजवाहू नौका)

मुरगाव बंदर

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) : आदित्य बिर्ला समुहाने १ लाख  ७० सहस्र टन बॉक्साईट खनिज हाताळणी मुरगाव बंदरातून महाराष्ट्रात ‘जे.एस्.डब्ल्यू. जयगड’ बंदरात हालवली आहे. याचा मोठा फटका केवळ मुरगाव पोर्ट प्राधिकरणालाच नव्हे, तर या उद्योगावर आधारित बार्जमालकांसह सर्वांच्या महसुलाला मोठा फटका बसला आहे. बॉक्साईट हाताळणी मुरगाव बंदरात बंद झाल्याने त्यामुळे सुमारे ३ कोटी रुपयांची हानी केवळ बार्ज उद्योगाची आणि एकूण १२ कोटी रुपयांची हानी संबंधित इतर आस्थापनांची मिळून झाल्याचे बार्जमालक संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणेने तातडीने हस्तक्षेप करून मुरगाव बंदरात बॉक्साईट वाहतूक पूर्ववत् चालू करण्याची मागणी केली आहे.

जिनिव्हा, पश्चिम आफ्रिका येथून ‘एम्.व्ही. स्टार स्कार्लेट’ हे जहाज आदित्य बिर्ला समुहाच्या ‘हिंडाल्को’ या आस्थापनासाठी बॉक्साईट खनिज आणणार होते; मात्र हे जहाज आता ‘जे.एस्.डब्ल्यू. जयगड’ बंदरात नेण्याचा निर्णय झालेला आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने त्याचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘‘आस्थापनांनी खनिज वाहतुकीसाठी अनुमती मागितल्यास शासनाकडून ती दिली जात नाही आणि यामुळे आस्थापनांच्या मालकांमध्ये याविषयी निरुत्साह आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी या दिवशी आदित्य बिर्ला समुहाने ‘हिंडाल्को’ आस्थापनासाठी बॉक्साईट मुरगाव बंदरात आयात केले होते; मात्र याची वाहतूक शासकीय कारणामुळे १० दिवस बंदरात अडकून पडली होती. यामुळे आस्थापनाला १५ कोटी रुपयांची हानी सोसावी लागली होती. बंदरातून ‘हिंडाल्को’ आस्थापनात बॉक्साईट नेण्यास काहींनी अडथळे निर्माण केल्याचा आस्थापनाचा आरोप आहे. याच वेळी आदित्य बिर्ला समुहाच्या ‘अल्ट्राटॅक सिमेंट’ आस्थापनासाठी आयात केलेला माल महाराष्ट्रात रायगड येथील बंदरात खाण खात्याची अनुमती न मिळाल्याने ८ दिवस अडकून पडला होता. हे जहाज गोवामार्गे कर्नाटक येथे जाणार होते. यामुळेही संबंधित आस्थापनाला आर्थिक हानी सोसावी लागली होती. आदित्य बिर्ला समुहाने बॉक्साईट खनिज हाताळणी मुरगाव बंदरातून महाराष्ट्रात ‘जे.एस्.डब्ल्यू. जयगड’ बंदरात हालवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा उद्योग क्षेत्रात नकारात्मक परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. मुरगाव बंदरात बॉक्साईट आल्यानंतर ते बंदरातील गोदामात उतरवण्यासाठी २० बार्जचा वापर केला जाणार होता, तसेच हे खनिज पुढे बेळगाव येथे नेण्यासाठी ट्रकचा वापर केला जाणार होता.

संपादकीय भूमिका

यात कुणाचे हितसंबंध आहेत, त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !