श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती दृढ श्रद्धा ठेवून व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावपूर्णरित्या करून अल्पावधीतच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा घनश्याम गावडे (वय ५० वर्षे) !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. एका साधिकेने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा निरोप सांगितल्यावर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी नाव घेतले, म्हणजे आता स्वतःची प्रगती निश्चितच होणार आहे’, अशी दृढ श्रद्धा निर्माण होणे :

सौ. सुप्रिया माथूर

‘अनुमाने ७ – ८ मासांपूर्वी मला सौ. स्वाती शिंदे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी तुम्हाला सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांना व्यष्टी साधनेचा आढावा द्यायला सांगितला आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणतात, ‘‘राधा गुणी मुलगी आहे. तिचा साधनेतील मुख्य अडथळा दूर होण्यासाठी आणि तिची आध्यात्मिक प्रगती शीघ्र गतीने होण्यासाठी तिला स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या आढाव्यात बसायला सांग.’’ त्यांचा निरोप ऐकताच मला आनंद झाला. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे नाव घेतले, म्हणजे आता माझी प्रगती निश्चितच होणार आहे’, अशी माझी दृढ श्रद्धा निर्माण झाली.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या आणि तुम्हीच मला साहाय्य करा’, अशी प्रार्थना करणे :

मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या आढाव्याला बसायला सांगितल्यावर मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आळवत होते, ‘तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या. ‘आढाव्यात पुष्कळ चिंतन सांगावे लागते. ते मला जमेल का ?’, असे मला वाटते. तुम्ही मला साहाय्य करा.’ त्याच रात्री मला एक स्वप्न पडले. मला त्या स्वप्नात दिसले, ‘माझी प्रगती झाली नाही; म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रडत आहेत. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना म्हणाले, ‘तुम्ही रडू नका. मी प्रयत्न करते. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मी त्यांचे चरण घट्ट पकडले.’ नंतर मला जाग आली. तेव्हा मला वाटले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ माझ्या समवेत आहेत. मी काळजी करायला नको. त्याच आता माझी प्रगती करून घेणार आहेत.’

३. सौ. सुप्रिया माथूर घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

३ अ. सुप्रियाताईने आढाव्यात दिलेले दृष्टीकोन ऐकून भावजागृती होणे आणि ‘गंगेचा झरा डोक्यावर पडून मन निर्मळ होत आहे’, असे जाणवणे :

 

सौ. सुप्रिया माथूर माझी सहसाधिका असल्याने तिला ‘माझी प्रकृती आणि माझे स्वभावदोष’ यांविषयी ठाऊक आहे. त्यामुळे मला तिचे चांगले साहाय्य मिळाले. मी सुप्रियाताईला विचारले, ‘‘मी आढावा कसा द्यायचा ग ? मी आढाव्यात काय सांगायचे ?’’ तेव्हा तिने मला धीर देऊन सांगितले, ‘अग, आज तुझा पहिला दिवस आहे. आज तू आढाव्यात अन्य साधक कसे सांगतात आणि त्यांना कसा दृष्टीकोन दिला जातो, ते ऐकून घे.’’ सुप्रियाताईने आढाव्यात दिलेले दृष्टीकोन ऐकून माझे मन एवढे अंतर्मुख झाले की, मला वाटले, ‘गंगेचा झरा माझ्या डोक्यावर पडून माझे मन निर्मळ होत आहे.’ माझी प्रक्रियेच्या आढाव्याच्या वेळी पुष्कळ भावजागृती झाली. सुप्रियाताईने आढाव्यात सांगितलेले प्रयत्न माझ्याकडून थोड्याफार प्रमाणात होऊ लागले.

३ आ. ‘डोक्यावरचे ओझे न्यून होत आहे’, असे जाणवणे आणि ‘किती ही गुरूंची कृपा !’, असे वाटून मन भरून येणे : सुप्रियाताईने आढाव्यात सांगितल्याप्रमाणे मी थोडेफार प्रयत्न करत असतांना ‘माझे डोक्यावरचे ओझे न्यून होत आहे’, असे मला जाणवत होते. सुप्रियाताई घेत असलेल्या आढाव्याच्या वेळी बसल्यावर मला वाटायचे, ‘तिने दिलेले दृष्टीकोन ऐकूनच माझे मन शुद्ध होत आहे. येथे बसल्याने माझा अहं न्यून होत आहे.’ ‘माझ्यावर किती ही गुरूंची कृपा आहे !’, असे वाटून माझे मन भरून येत असे.

४. सौ. सुप्रिया माथूर यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

४ अ. आढावा चालू असतांना शरणागतभाव ठेवून देवाला आळवणे : सुप्रियाताईच्या आढाव्याला बसल्यावर मी देवाला शरण जाऊन प्रार्थना करत असे, ‘हे देवा, मला काही कळत नाही. ताई देत असलेले अमूल्य ज्ञान मला ग्रहण करता येऊ दे. मला शिकता येऊ दे. तुझ्या आशीर्वादाविना मला हे ज्ञान ग्रहण करता येणार नाही.’ मी आढावा चालू असतांना शरणागतभाव ठेवून देवाला आळवत असे.

४ आ. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघून प्रार्थना करत होते, ‘हे श्रीकृष्णा, तुझ्या सुदर्शनचक्राने माझे अज्ञान नष्ट करून मला ज्ञान प्रदान कर.’ अशी मी देवाकडे पुष्कळ आळवणी केली.

४ इ. स्वप्नात सौ. सुप्रिया माथूर राधेच्या रूपात दिसणे आणि श्रीकृष्णाने सूक्ष्मातून ‘माझ्या हातात असलेले सुदर्शनचक्र, म्हणजे तुझे अज्ञान नष्ट करणारी सौ. सुप्रियाताई, हे माझे रूप आहे आणि ती तुला पुढे घेऊन जाणार आहे’, असे सांगणे : त्या रात्री मला स्वप्नात  सुप्रियाताई राधेच्या रूपात दिसली. मी श्रीकृष्णाला सूक्ष्मातून विचारले, ‘देवा, सुप्रियाताई मला राधेच्या वेशात का दिसत आहे ?’ तेव्हा श्रीकृष्ण सूक्ष्मातून मला म्हणाला, ‘अगं, माझ्या हातात असलेले सुदर्शनचक्र, म्हणजे तुझे अज्ञान नष्ट करणारी सौ. सुप्रियाताई, हे माझे रूप आहे. ती तुला पुढे घेऊन जाणार आहे.’ मी याविषयी सुप्रियाताईला सांगितले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘तुझ्यावर गुरूंची कृपा आहे. त्यात माझे काही नाही. तुझ्यातील भावामुळे तुला अनुभूती आली.’’

५. ‘सौ. स्वाती शिंदे माझ्या गुरुच आहेत’, असे मला वाटते. मला त्यांच्याबद्दल पुष्कळ प्रेम आणि जवळीक वाटते. ‘पैसे देऊनही एवढे अमूल्य दृष्टीकोन कुठेही मिळणार नाहीत’, असे वाटून मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटते.

६. मी ३ मास सुप्रियाताईला आढावा दिल्यानंतर मी पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या संत, वय ४६ वर्षे) यांना व्यष्टी साधनेचा आढावा देऊ लागले. तेव्हा मी चुका सांगितल्यावर पू. रेखाताईंनी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे माझे मन शुद्ध व्हायला साहाय्य झाले. मी पू. रेखाताईंना प्रांजळपणे मनाच्या स्तरावरील चुका सांगत असे.

७. नागीण झाल्यावर निवासस्थानी थांबावे लागल्यावर केलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न

७ अ. देवाला आळवणे आणि मानस क्षमायाचना करणे : मला नागीण झाल्यामुळे निवासस्थानी थांबावे लागले. तेव्हा मला माझ्याकडून सेवेत झालेल्या चुका समजल्या. मला माझी चूक समजल्यावर मी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडे मानस क्षमायाचना केली अन् प्रायश्चित्त घेतले. मी देवाला पुष्कळ आळवत असे, ‘देवा, मला क्षमा कर. मला क्षमा कर.’ मी प्रायश्चित्त घेतल्याने मला माझ्याकडून झालेल्या चुकीची पुष्कळ खंत वाटली. मी माझी व्यष्टी साधना चालू ठेवली. त्यामुळे मी निवासस्थानी एकटी असतांनाही मला कंटाळा आला नाही.

७ आ. यजमान करत असलेल्या सेवेबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटणे : मी निवासस्थानी रहात असल्यामुळे माझ्या यजमानांनी (श्री. घनश्याम यांनी) मला जेवणाचा डबा आणून देणे, औषध देणे, औषध वाटून लेप बनवणे, मला जेथे जखम झाली होती, तेथे औषध लावणे, खोलीची स्वच्छता करणे, देवपूजा करणे इत्यादी सेवा भावपूर्ण केल्या. त्यांचा सेवाभाव बघूनच मला पुष्कळ कृतज्ञता वाटत असे. मला वाटायचे, ‘मी त्यांची सेवा करायला हवी, तर तेच माझी सेवा करत आहेत.’

८. आध्यात्मिक पातळी घोषित होण्याच्या पहाटे स्वप्नात दिसलेले दृश्य पाहून आनंदावस्था अनुभवणे :

माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या दिवशी पहाटे ४ वाजता मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संग घेत आहेत. त्या सत्संगात माझी पुष्कळ भावजागृती होत आहे. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘तुम्ही चहा प्यायला येणार का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी होकार दिला. मी लगबगीने स्वयंपाकघरात जाते आणि चहा करण्याची सिद्धता करते. तेव्हा गॅसवर तापायला ठेवलेले दूध नासते; म्हणून मी लगबगीने दूध आणण्यासाठी बाहेर जाते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांना प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करत असतात. त्या मला पाहून ‘राधा’ अशी हाक मारतात.’ त्यांचा प्रेमळ आवाज ऐकून मला जाग येते. तेव्हा मी पुष्कळ आनंदावस्था अनुभवत होते. मला स्थिर वाटत होते.

९. आश्रमात आल्यावर अनुभवलेली भावस्थिती :

मी १५ दिवसांनी आश्रमात सेवेसाठी आले. तेव्हा सहसाधक माझी आठवण काढत होते. ‘त्यांच्या आशीर्वादानेच मला बरे वाटले’, असे वाटून मला सर्वांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. मला ‘सर्वांवरती पुष्कळ प्रेम करावे’, असे वाटत होते. मला आतून पुष्कळ आनंद होत होता.’

– सौ. राधा घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२४)