बारामती (जिल्हा पुणे) – मोरगाव (तालुका बारामती) येथील ‘महावितरण कार्यालया’तील तंत्रज्ञ महिला रिंकू बनसोडे यांच्यावर अभिजित पोटे याने कोयत्याने वार करून हत्या केली. बारामती पोलिसांनी पोटे याला अटक केली आहे. पोटे हा ‘घरातील विजेचे देयक अधिक कसे येते ?’ याची विचारणा करण्यासाठी कार्यालयात आला होता. मोरगाव येथील ‘महावितरण’च्या कार्यालयात त्या एकट्या असतांना ११ वाजता अभिजित पोटे या व्यक्तीने रिंकू यांच्याशी बोलत असतांना हातातील कोयत्याने १६ वार केले. घायाळ रिंकू यांना मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेल्यावर त्यांचे दुपारी ३ वाजता निधन झाले.
आरोपीचे वीजदेयक रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्याचे चालू महिन्याचे ६३ युनिट वापराचे ५७० रुपये एवढेच देयक आले होते. मागील १२ महिन्यांचा वापर तपासला असता ४० ते ७० युनिट असा वीजवापर आहे. हे देयक वापरानुसार आणि नवीन दरानुसार योग्यच आहे. या ग्राहकाने वीजदेयकाविषयी कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवली नसल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. (सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा ! – संपादक)