Loksabha Elections 2024 : कुणाच्या संपत्तीचे फेरवाटप करणार, ते काँग्रेसने घोषित करावे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) : काँग्रेसने त्यांच्या घोषणापत्रामध्ये संपत्तीचे फेरवाटप करणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने ते कुणाच्या संपत्तीचे फेरवाटप आणि ते कुणाला करणार, हे त्यांनी घोषित करावे. गोमंतकातील परदेशात वास्तव्यास असलेले लोक त्यांचे घामाचे पैसे भारतात पाठवून येथे ठेवरक्कम म्हणून अधिकोषात गुंतवतात आणि अशा लोकांनी काँग्रेसच्या या सूत्राची गंभीरतेने नोंद घेतली पाहिजे. काँग्रेसने ख्रिस्ती बंधू आणि भगिनी यांना त्यांच्या कोणत्या संपत्तीचे ते वाटप करणार ते सांगितले पाहिजे, असे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तसंस्थेकडे बोलतांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिल या दिवशी राजस्थान येथे एका प्रचारसभेत काँग्रेसच्या घोषणापत्रावर टीका करतांना काँग्रेस नागरिकांची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना अधिक मुले असतात त्यांना वाटणार असल्याची टीका केली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,

‘‘काँग्रेसच्या घोषणापत्रात २ धर्मांत फूट पाडण्याचा प्रकार आहे. घोषणापत्रात संपत्तीचे फेरवाटप करण्याच्या सूत्रावर स्पष्टता नाही. काँग्रेसचे गोव्यातील उमेदवार रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांनी या सूत्रावर नागरिकांना स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. आपली संपत्ती, सोने यांचे काँग्रेस फेरवाटप करणार आहे का ? इंग्लंडमध्ये रहाणार्‍या मूळ गोमंतकियांना आता काँग्रेसची भीती वाटायला लागणार आहे. काहींची कुटुंबे आकाराने मोठी आहेत आणि त्यांना पैसे दिल्यास देश धोक्यात येईल. लोकांना काँग्रेसचे ‘न्याय पत्र’ (काँग्रेसच्या घोषणापत्राचे नाव) समजलेले नाही; मात्र लोकांना यामधील काँग्रेसचा मूळ हेतू समजायला लागल्यानंतर लोक काँग्रेसवर काहीही फेकून मारतील.’’

‘मोदींची गॅरंटी’मध्ये सुस्पष्टता !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजपच्या घोषणापत्राविषयी बोलतांना पुढे म्हणाले, ‘‘भाजपची ‘मोदींची गॅरंटी’मध्ये सुस्पष्टता आहे. यामध्ये समान नागरी कायदा लागू करणे या सूत्राचा समावेश आहे. गोव्यात समान नागरी कायदा लागू आहे. काँग्रेस समान नागरी कायदा लागू करणार कि संपत्तीचे फेरवाटप करणार ? हे त्यांनी स्पष्ट करावे. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार (‘सीएए’नुसार) शीख, बौद्ध आणि ख्रिस्ती यांना भारतीय नागरिकत्व मिळणार.’’