WB Violance : जेथे हिंसाचार झाला, तिथे निवडणुका घेऊ नयेत ! – कोलकाता उच्च न्यायालय

रामनवमीच्या वेळी मुर्शिदाबाद (बंगाल) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश  

मुर्शिदाबाद (बंगाल) – मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. यासमवेतच न्यायालयाने निवडणूक आयोगाला सध्याची परिस्थिती पहाता जिल्ह्यातील बेरहामपूर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलण्यास सांगितले.

या वेळी न्यायालयाने म्हटले, ‘जर लोक २४ घंटे शांततेने कोणताही सण आनंद घेऊन साजरा करू शकत नसतील, तर अशा मतदारसंघात लोकसभा निवडणूक घेऊ नये. आदर्श आचारसंहिता लागू असूनही लोकांचे २ गट भांडत असतील, तर एकमेकांना त्यांच्या प्रतिनिधींना मतदान करण्याचा अधिकार नाही.’’

सौजन्य India Today

या प्रकरणाची राष्ट्र्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. यावर आता पुढील सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.

संपादकीय भूमिका 

हे बंगालमधील तृणमूल काँग्रेसला लज्जास्पद ! लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असणारी निवडणूकच घेण्यासारखी स्थिती नाही, असे उच्च न्यायालयाला वाटते, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. ही स्थिती पहाता केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे !