दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध ; मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !…

तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध 

मुंबई – लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या ११ मतदारसंघांत एकूण ३१७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांत ७ मे या दिवशी मतदान होणार आहे.


मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !

मुंबई – नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाला २१ एप्रिल या दिवशी दुपारी आग लागली. सध्या या कार्यालयाच्या डागडुजीचे काम चालू आहे. या वेळी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अनुमान आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दुर्घटनेविषयी माहिती देतांना ही आग मुख्य कार्यालयाला लागली नसून कार्यालयाच्या मागील बाजूला लागल्याचे सांगितले. आगीनंतर १ घंट्यामध्ये अग्निशमन यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळवले. हे भाजपचे राज्यातील मुख्य कार्यालय असून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे कार्यालयही येथेच आहे.


अभाविपच्या वतीने बेळगाव येथे निदर्शने !

बेळगाव – नेहा हिरेमठ प्रकरणाचे आवश्यक वाटल्यास केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वतीने अन्वेषण व्हावे, कायदा हातात घेणार्‍या आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राणी चनम्मा चौकात निदर्शने करण्यात आली.

नेहा हिरेमठ प्रकरण


पुणे येथे धर्मांधाने केली ११ लाख रुपयांची फसवणूक !

पुणे – जुन्या चारचाकी, दुचाकी गाड्यांच्या खरेदी-विक्री करणार्‍या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या जुज्जर रामपुरवाला याने दुकान मालकाची ११ लाख ४ सहस्र रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मालक सूरजप्रकाश खंडेलवाल यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. ही घटना नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत घडली आहे. जुज्जर याने ४ चारचाकी गाड्या आणि ९ दुचाकी गाड्या यांची परस्पर विक्री करून त्याचे पैसे स्वत:च्या खात्यावर जमा करून अपहार केला आहे.

संपादकीय भूमिका : लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !


लग्नातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि हत्या

गोंदिया – देवरी तालुक्याच्या ककोडी परिसरातील वटेकसा गावात शेजार्‍यांच्या  लग्नात पालकांसह आलेली १२ वर्षीय मुलगी रात्री ८ वाजता अचानक गायब झाली. शोध घेऊनही सापडली नाही. दुसर्‍या दिवशी तिचा मृतदेह जंगलात सापडला. कुणीतरी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या घटनेनंतर गावातील वातावरण तापले असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.