देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. गुरुनाथ दाभोलकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘२३.२.२०२४ या दिवशी आम्हाला रामनाथी, गोवा येथून पनवेलपर्यंत पू. दाभोलकरकाका (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) यांच्यासह रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळाली. या वेळी पू. काकांची अनेक गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. ती कृतज्ञतापूर्वक श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

१. पू. दाभोलकरकाका यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. गुरुनाथ दाभोळकर

१ अ. चांगली स्मरणशक्ती : ‘पू. काकांना जुने संदर्भ चांगले आठवतात’, असे माझ्या लक्षात आले. त्यांचे वय अधिक असूनही त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.

१ आ. झोप लागली किंवा लागली नाही, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले चैतन्य देणार आहेत, अशी दृढ श्रद्धा असणे : पू. काकांना कधी कधी रात्रीची झोप लागत नाही. एरव्हीही त्यांना ३ – ४ घंटेच झोप लागते, तरीही त्यांच्या दुसर्‍या दिवशीच्या दिनक्रमावर काहीच परिणाम होत नाही. दुसर्‍या दिवशी ते नेहमीप्रमाणेच उत्साही असतात. यामागचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी रात्री झोपतांना प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करतो, ‘झोपेतून चैतन्य देणारे तुम्हीच आहात आणि झोप लागली नाही, तर सव्वापट चैतन्य देणारेही तुम्हीच आहात.’’

यावरून लक्षात आले, ‘झोप लागली किंवा लागली नाही, तरी पू. काका त्याकडे साक्षीभावाने पहातात. ‘झोप मिळाली नाही, तरी देव चैतन्य देणार आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळेच झोप न्यून होऊनही ते नेहमीप्रमाणे उत्साही राहू शकतात.’

सौ. गौरी कुलकर्णी

१ इ. अध्यात्मात भाव महत्त्वाचा ! : पू. काकांनी प्रवासात मला अनेक अनुभूती आणि देवावर श्रद्धा वाढवणारे प्रसंग सांगितले. ते म्हणाले, ‘‘अध्यात्मात भाव महत्त्वाचा आहे.’’ मी म्हणाले, ‘‘पू. काका, तोच तर माझ्यात अल्प पडतो. सारखी बुद्धी आड येते.’’ तेव्हा पू. काका हसून म्हणाले, ‘‘देवाने आम्हाला बुद्धीच दिली नाही. अडाणी ठेवले, ते बरे झाले ! देवाला भोळा भाव आवडतो. आमच्यात भाव आहे कि नाही, ठाऊक नाही; पण आम्ही भोळे आहोत.’’

खरे तर संत विश्वबुद्धीशी एकरूप झालेले असतात. त्यांच्यासमोर आम्ही साधना नीट न करणारे अडाणी आहोत; पण ‘देवाने मला भावाचे महत्त्व सांगण्यासाठी हा प्रसंग निर्माण केला’, असे माझ्या लक्षात आले.

१ ई. पू. दाभोलकरकाका बोलत असतांना प.पू. आबा उपाध्ये यांची आठवण येणे : पूर्वी पुण्याला असतांना मी प.पू. (कै.) आबा उपाध्ये यांच्याकडे सेवेनिमित्त जायचे. ‘पू. दाभोलकरकाका यांचे बोलणे, काही घटना सांगण्याची पद्धत आणि प.पू. आबा यांची सांगण्याची पद्धत एकसारखीच आहे’, असे मला जाणवले.

२. शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. देवाशी जोडलेले असणे : पू. काकांनी काही अनुभूती सांगितल्या. या सर्व अनुभूती माझी देवावरची श्रद्धा वाढवण्यासाठीच होत्या. पू. काका अनुभूती सांगत होते, तेव्हा ते केवळ कृतज्ञताभावाने सर्व अनुभूती सांगत होते. ‘उच्च प्रतीच्या अनुभूती येऊनही संत किती साधे असतात आणि देवाशी जोडलेले असतात’, हे यातून शिकायला मिळाले.

२ आ. पू. दाभोलकरकाकांनी कोणतीही कृती करण्यापूर्वी प्रार्थना आणि कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगणे : थोडा प्रवास झाल्यानंतर मी विश्रांती घेण्यासाठी वरच्या ‘बर्थ’वर जात होते. तेव्हा पू. काकांनी प्रार्थना करून ‘बर्थ’वर जायला सांगितले. ते म्हणाले, ‘‘कोणतीही कृती करण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करायला हवी आणि कृती झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायला हवी.’’ पू. काका हे सूत्र पुष्कळ तळमळीने सांगत होते. तेव्हा प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची मला जाणीव झाली.

३. कृतज्ञता

‘देवाच्या कृपेने मला प्रवासात संतांचा सत्संग मिळाला आणि त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या’, यासाठी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘मला संतांकडून शिकायला मिळालेली सर्व सूत्रे कृतीत आणता येऊ देत आणि माझा देवाप्रती भक्तीभाव वाढू दे’, अशी प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा. (९.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या व संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक