Malegaon Case : साध्वी प्रज्ञा सिंह यांना २५ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा  आदेश !

  • मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

  • उपस्थित न राहिल्यास कारवाई होणार !

खासदार साध्वी प्रज्ञासिंह

मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी २५ एप्रिलपर्यंत जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित रहा, असा आदेश मुंबई विशेष न्यायालयाने भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना २० एप्रिल या दिवशी दिला. यापूर्वी न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव प्रज्ञा सिंह यांना न्यायालयात उपस्थित न रहाण्याची सवलत दिली होती.

यापूर्वी ८ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना २० एप्रिलपर्यंत न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता; पण या दिवशी उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने वरील आदेश दिला आहे. २५ एप्रिल या दिवशी उपस्थित न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मागील महिन्यात न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले होते; मात्र अधिवक्त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या प्रकृतीची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिली होती. यापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सुनावणीसाठी उपस्थित न रहाण्याविषयी न्यायालयाकडे सवलत मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना सवलत दिली होती. त्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या प्रकृतीचा अहवाल न्यायालयात सादर करून त्यांना मध्यप्रदेश येथून मुंबईत प्रवास करण्यास अडचण नसल्याचे म्हटले. त्यावरून न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता.

२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावमधील मशिदीबाहेर बाँबस्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक गंभीर घायाळ झाले होते.