१९ एप्रिल या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/785544.html
३. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधना
३ इ. व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात येणे आणि ‘शारीरिक अन् मानसिक बळ केवळ श्री गुरुच वाढवू शकतात’, हे आश्रमात आल्यावर अनुभवता येणे : आम्हाला आश्रमजीवनाचा कसलाही अनुभव नसतांना आम्ही व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो. ‘आम्हाला आश्रमातील कार्यपद्धत किंवा आश्रमात कसे रहातात ?’, हे काहीच ठाऊक नव्हते; तरीही देवाने आम्हाला सर्वकाही शिकवले. ‘माझे शारीरिक आणि मानसिक बळ केवळ श्री गुरुच वाढवू शकतात’, हे मला आश्रमात आल्यावर अनुभवता आले.
४. आश्रमात सेवा करू लागल्यावर स्वभावदोषांची झालेली जाणीव आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठी देवाने केलेले साहाय्य !
आश्रमात आल्यावर देवाने मला ‘धान्य निवडणे, रुग्ण साधकांची सेवा करणे आणि स्वच्छतेचे नियोजन करणे’, अशा छोट्या छोट्या सेवा दिल्या अन् माझ्या नकळत मला सर्वकाही शिकवले.
४ अ. रुग्ण साधकांच्या सेवेसाठी मोठ्या रुग्णालयात जावे लागणे आणि स्वभावदोषांमुळे अडचणी येऊनही सेवेतून आनंद मिळणे : काही वेळा मला रुग्ण साधकांची सेवा करण्यासाठी मोठ्या रुग्णालयात जावे लागले. गोव्यात सर्वत्र कोकणी बोलतात. ते मला समजत नसे, तसेच ‘रुग्णालयातील कोणत्या ‘वॉर्ड’मधून कुठे आणि कसे जायचे ?’, हे १-२ वेळा दाखवून अन् सांगूनही ते माझ्या लक्षात रहात नसे. माझ्या भित्र्या आणि अबोल स्वभावामुळे ‘पुनःपुन्हा कुणाला आणि कसे विचारायचे ?’, असे मला वाटायचे. माझा ‘प्रतिमा जपणे’, हा स्वभावदोषही आड यायचा; पण विचारण्याविना माझ्याकडे काहीच पर्याय नसायचा. तेव्हा मी देवाला पुष्कळ प्रार्थना करायचे आणि तेथील परिचारिकांना विचारायचे. मी त्यांना म्हणायचे, ‘‘मला कोकणी येत नाही. मराठीत सांगा.’’ मग त्या मला मराठीत सांगायच्या. त्या सेवेतून मला आनंद मिळत असे.
४ आ. दायित्व घेऊन सेवा करू लागल्यावर स्वतःमधील स्वभावदोषांची जाणीव होणे आणि देवाने पू. रेखा काणकोणकर अन् सौ. सुप्रिया माथूर यांच्या माध्यमातून सर्व साधकांना सांभाळून घेऊन सेवा करण्यास शिकवणे : पुढे काही दिवसांनी मला काही दायित्व देण्यात आले. तेव्हा ‘माझ्यामध्ये किती स्वभावदोष आणि अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. तोपर्यंत मला माझ्या चुका लक्षात येत नसत आणि ‘माझ्यात स्वभावदोष अन् अहं नाही’, असे मला वाटत असे. देवाने माझा तो भ्रम दूर केला आणि खर्या अर्थाने माझ्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला आरंभ झाला. ‘सेवा करणार्या वयस्कर, मध्यम आणि लहान अशा सर्वच वयाच्या साधकांच्या समवेत राहून सर्वांना कसे सांभाळून घ्यायचे ? प्रयत्न कसे करायचे ?’, हे सर्व देवाने मला पू. रेखाताई काणकोणकर (सनातनच्या ६० व्या संत) आणि सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्या माध्यमातून शिकवले अन् आताही शिकवत आहे.
४ इ. धान्याचा अभ्यास करण्याची सेवा मिळाल्यावर मनाचा संघर्ष होणे; पण सहसाधिकांनी ती सेवा शिकण्यास प्रोत्साहन देणे : मला धान्य निवडणे इत्यादी सेवा जमायला लागल्यावर देवाने लगेच मला धान्यांचा अभ्यास करून त्याविषयीचे लिखाण करण्याची सेवा दिली. तेव्हा माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. मी पहिल्यापासून अभ्यासात हुशार नव्हते. त्यामुळे आता हा अभ्यास म्हटले की, मला ‘नको’ वाटायचे. जी सेवा करायला सहसाधिकांना १ घंटा लागत असे, ती सेवा करायला मला २ – ३ घंटे लागायचे. त्यामुळे ‘ती सेवा करायला नको’, असे मला वाटायचे; पण त्या साधिका मला सांगायच्या, ‘‘किती वेळ जातो ?’, हे बघू नकोस. हे सर्व तुला शिकून घ्यायचे आहे.’’
४ ई. ‘या सेवेतून देव घडवत आहे’, हे लक्षात येणे आणि त्यातून गुरुदेवांची प्रीती अनुभवून कृतज्ञता वाटणे : माझी परात्पर गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा त्यांनीही मला हेच सांगितले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘देवाला ‘मला वेळ किती लागतो ?’, हे महत्त्वाचे वाटत नसून ‘मला घडवणे आणि शिकवणे’, हे महत्त्वाचे वाटत आहे.’ मला दुसर्याच दिवशी धान्याच्या अभ्यासाची सेवा मिळाली आणि ती माझ्या पटकन लक्षात आली. ती सेवा करून मला पुष्कळ आनंदही मिळाला. तेव्हा ‘देवाला मला घडवण्याची किती काळजी आहे !’, हे मला शिकायला मिळाले. अशा प्रकारे सर्व साधकांच्या माध्यमांतून मला परात्पर गुरुदेवांची प्रीती अनुभवता आली.
४ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेच्या मुलांना ‘मीच तुमची आई आणि बाबा आहे’, असे म्हटल्यावर तिला मुलांविषयी वाटणारी काळजी दूर होणे : ‘माझी दोन्ही मुले (श्री. ऋषिकेश आणि श्री. आशुतोष) शांत आणि समंजस आहेत’, ही देवाची मोठी कृपाच आहे. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या मुलांना म्हणाल्या, ‘‘मीच तुमची आई आणि बाबा आहे. तुम्ही कसलाही विचार किंवा काळजी न करता आनंदाने सेवा आणि साधना करा.’’ त्यांचे हे शब्द मी आजही अनुभवत आहे. माझ्यात ‘काळजी करणे’, हा पुष्कळ तीव्र स्वभावदोष असूनही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या बोलण्यानंतर मला मुलांची किंवा इतर गोष्टींची काळजी वाटत नाही. खरे पाहिले, तर माझ्या स्वभावदोषांमुळे मी मुलांना व्यवस्थित घडवू शकले नसते; पण गुरुदेवांच्या कृपेमुळे आज आम्ही सर्व जण साधनेत टिकून आहोत.
५. अनुभूती – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या एका दैवी शब्दाने मनातील संघर्षावर मात करता येणे
जेव्हा माझ्या मनाची स्थिती संघर्षमय असते, तेव्हा अकस्मात् मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भेटतात आणि विचारतात, ‘‘बर्या आहात का ?’’ तेव्हा माझ्या तोंडून ‘हो’, असे म्हटले जाते आणि मी मनाच्या संघर्षातून लगेच बाहेर पडून आनंदी होते. असे बर्याचदा होते. तेव्हा मला वाटले, ‘त्या माझ्या आई आहेत आणि त्यांना आपल्या लेकराचे सर्वकाही कळते.’ त्यांच्या एका दैवी शब्दाने मला माझ्या मनाच्या संघर्षावर मात करण्यासाठी बळ मिळते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जीवनातील संघर्ष संपणे आणि जीवन आनंदाने जगता येणे
‘समष्टीत रहाणे, बोलणे, वागणे आणि आढावा घेणे’, हे माझ्यासाठी पुष्कळ कठीण होते; पण ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) हे सर्व माझ्याकडून कसे करवून घेतले ?’, ते मला कळलेही नाही. त्यांनीच मला सर्व शिकवले आणि त्यांनीच मला सेवा अन् साधना यांची गोडी लावली. माझी गुरुमाऊली फार कृपाळू आहे. ‘तिच्याविना मी जीवन जगू शकत नाही’, हे माझ्यासाठी स्पष्ट आहे. तिच्यामुळेच आज मी जिवंत आणि आनंदी आहे; अन्यथा पूर्वायुष्यातील संघर्षात माझे जीवन संपले असते.
७. प्रार्थना
‘देवा, तू मला भरपूर काही शिकवले आहेस; पण माझ्या लहानशा बुद्धीला जे जमले, ते मी तुझ्या चरणी अर्पण करते. ‘हे दयाघना, मला इतर काहीच नको. केवळ आणि केवळ तुझ्या चरणांजवळ ठेव. मी कुठेही जाण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तू मला सोडू नकोस’, अशी तुझी माझ्यावर कृपा असू दे’, ही तुझ्या कोमल चरणी शरणागतभावाने कळकळीची प्रार्थना आहे.
‘हे गुरुमाऊली, ‘तुझ्याच अनंत कृपेमुळे मी आज साधनेत आहे. मला आनंद अनुभवायला मिळत आहे’, त्यासाठी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मनीषा दामोदर गायकवाड (वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |