साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

१. लहान असतांना विहिरीत पडूनही गुरुकृपेने वाचणे

सौ. मनीषा गायकवाड

‘मी दीड वर्षाची असतांना विहिरीत पडले होते. तेव्हा देवाने जणू मला पाण्यावर धरून ठेवले होते. तेव्हा माझे वजन १२ – १३ किलो होते, तरीही मी पाण्यात बुडाले नाही. ही माझ्यावरील श्री गुरूंची सर्वांत मोठी कृपा आहे.

२. वैवाहिक जीवन

२ अ. लवकर लग्न झाल्याने व्यावहारिक ज्ञान नसतांनाही सासरच्या मंडळीनी समजून घेणे : माझे लग्न लवकर झाले. त्यामुळे मला संसार आणि व्यवहार यांविषयी काही ज्ञान नव्हते. माझ्या सासूबाई पुष्कळ कडक स्वभावाच्या होत्या. त्या मला समजून घेत नसत आणि माझ्याशी बोलत नसत. त्यामुळे मी सतत ताणाच्या आणि भीतीच्या वातावरणात वावरत असे; पण देवाने मला माझे यजमान, सासरे, दीर आणि इतर सर्व नातेवाईक पुष्कळ चांगले दिले. देव मला त्यांच्या माध्यमातून सर्व समजावून सांगायचा आणि शिकवायचाही.

२ आ. आर्थिक स्थिती खालावून पुष्कळ ऋण होणे आणि देवाला प्रार्थना केल्यावर यजमानांना चांगली नोकरी मिळणे : आमच्या घरात माझे यजमान सर्व व्यवहार सांभाळायला लागल्यानंतर काही दिवसांनी आमची आर्थिक स्थिती खालावली आणि पुष्कळ ऋण (कर्ज) झाले. त्यामुळे मला सतत मानसिक त्रासाला सामोरे जावे लागायचे. समाजातील लोक आणि नातेवाईक आम्हाला पुष्कळ बोलायचे. त्यानंतर आम्ही आमच्या वाट्याला येणारी सर्व भूमी विकून ऋण फेडायचा प्रयत्न केला, तरीही एक लक्ष रुपयांचे ऋण बाकी होते. तेव्हा मी नियमित प्रार्थना करायचे, ‘हे देवा पांडुरंगा, आमच्याकडे काही संपत्ती नसली, तरी चालेल; पण या ऋणातून आम्हाला मुक्त कर आणि शांतपणे जीवन जगत तुझी भक्ती करता येऊ दे. कुणाचे ऋण माथ्यावर घेऊन या जीवनातून जायला नको.’ देवाने आम्हाला चांगला मार्ग दाखवला. माझे यजमान नोकरी करण्यासाठी पुण्याला आले. त्यांना त्यांच्या मित्राच्या ओळखीने चांगल्या आस्थापनात नोकरी मिळाली.

२ इ. पुण्यात आल्यावर खानावळ चालवून चांगल्या मार्गाने पैसे मिळवणे : नंतर आम्ही पुण्यात घरीच खानावळीचा व्यवसाय चालू केला. आपण आपल्यासाठी जसा स्वयंपाक करतो, तसाच स्वयंपाक आम्ही खानावळीतील सर्वांसाठी करायचो. त्यामुळे आमच्याकडे अनेक लोक जेवणासाठी यायचे. ‘देवाने आमच्याकडून प्रामाणिकपणे व्यवसाय करवून घेतला’, ही देवाची आमच्यावरील मोठी कृपाच आहे. आमच्या मनात पैसे मिळवण्यासाठी काहीतरी अयोग्य करण्याचा विचारही कधी आला नाही.

३. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधना 

३ अ. आर्थिक स्थिती चांगली असूनही पती-पत्नीमध्ये भांडणे होणे आणि तेव्हा घरात शांतता नांदण्यासाठी देवाला प्रार्थना करणे : आमचे आर्थिकदृष्ट्या सर्वकाही चांगले चालू होते; पण घरात शांतता नसायची. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून आम्हा पती-पत्नीत पुष्कळ भांडणे व्हायची. तेव्हा मी देवाला पुष्कळ शरण जाऊन प्रार्थना केली, ‘हे देवा, मला संपत्ती नको, तर शांतता आणि आनंद हवा आहे. तो मला दे, इतर काहीच नको.’

३ आ. सनातनच्या साधकांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने जीवनात आनंद येण्यास आरंभ होणे आणि गुरुकृपेने सर्वांना साधनेचा ध्यास लागणे : त्यानंतर लगेचच आम्हाला सनातनचे साधक भेटले आणि त्यांनी आम्हाला कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपांचे महत्त्व सांगितले. तेव्हापासून परात्पर गुरुदेवांच्या कृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) आम्हा कुटुंबियांच्या जीवनात आनंद येण्यास आरंभ झाला. आम्हा सर्वांनाच पैसा आणि सांसारिक गोष्टी नकोशा वाटायला लागल्या. आम्हाला ‘सत्संग, सत्सेवा आणि साधनाच करावी’, असे वाटू लागले. आमच्या घरातील भांडणे न्यून होऊ लागली. मुले हुशार असूनही त्यांना पूर्णवेळ साधना करण्याचा ध्यास लागला. ही सर्व गुरुकृपाच आहे. (क्रमश:)

–  सौ. मनीषा दामोदर गायकवाड (वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

याच्या नंतरचा भाग लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/785870.html