Loksabha Elections 2024 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !

लोकसभा निवडणूक २०२४

  • चांदमारीमध्ये भाजपच्या बूथ अध्यक्षांवर आक्रमण

  • दिनहाटामध्ये सापडला बाँब

  • तुफानगंजमध्ये हाणामारी

  • कूचबिहारमध्ये दगडफेक

कोलकाता – लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी, म्हणजे १९ एप्रिल २०२४ या दिवशी बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. कूचबिहारमधील चांदमारी भागात भाजपचे बूथ अध्यक्ष लब सरकार यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ते गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती  करण्यात आले आहे, तसेच या भागात जोरदार दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले आहेत.

तुफानगंजमध्येही हाणामारी झाली आहे. याखेरीज कूचबिहारमधील दिनहाटा भागात भाजपच्या कार्यकर्त्याच्या घराबाहेर बॉम्ब सापडला आहे. कूचबिहारमध्ये मतदानाच्या वेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे, तसेच तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी लोकांना मतदानापासून रोखल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. हा आरोप फेटाळत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचा प्रत्यारोप भाजपने केला आहे.

सौजन्य : News18 India

संपादकीय भूमिका 

या घटनेवरून ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?