पुणे येथे चोरीची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील प्रकार, ८ दिवसांनी तक्रारीची नोंद

पुणे – चहाचे दुकान बंद करून निघालेल्या चहा विक्रेत्याचे ५ सहस्र रुपये चोरल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यास भारती विद्यापीठ पोलीस टाळाटाळ करत आहेत. वरिष्ठ अधिकारी नसल्याने गुन्हा नोंद करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. पुन्हा २ दिवसांनी बोलावले, तरीही गुन्हा नोंद केला नाही. त्यानंतर मला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तेथे आल्यानंतरसुद्धा कोणीही नोंद घेतली नाही. घटना घडून ८ दिवस झाले, तरी अद्याप तक्रार प्रविष्ट न झाल्याची खंत पीडित बाळू कटके यांनी व्यक्त केली आहे. (तक्रार नोंदवून न घेता पीडिताला पुन:पुन्हा फेर्‍या मारायला लावणे, हा अन्यायच आहे ! – संपादक)

कटके यांचे कोथरूड भागातील मॉडेल कॉलनीमधील दीप बंगला चौकाजवळ चहाचा स्टॉल (दुकान) आहे. ५ एप्रिलच्या रात्री ९ वाजता ते दुकान बंद करून जात असतांना ते गुजरवाडी फाट्याजवळ ‘कशीही गाडी चालवतो’ म्हणून एका आरोपीने पाय पकडला. त्यानंतर त्यांना धमकावत खिशातून ५ सहस्र रुपये घेऊन तिघे पसार झाले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील म्हणाले, ‘‘गुन्हा नोंद का करण्यात आला नाही ? याचे अन्वेषण करू. त्वरित गुन्हा नोंद करून घेतला जात आहे.’’

संपादकीय भूमिका :

राज्यघटनेतील ‘सर्वांना समान न्याय’, हे तत्त्व न पाळणारे पोलीस खाते ! हा राज्यघटनेचाही अवमान नाही का ? सामान्य नागरिकांची तक्रार प्रविष्ट करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांच्या विरोधात ‘कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी’ गुन्हा नोंद केला पाहिजे !