प्रतापगडप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन झाल्यावर एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – ज्याप्रमाणे प्रतापगड येथील अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यासाठीही सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना तेथील सर्व वस्तूस्थिती सांगितली.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, कोल्हापूर शहराध्यक्ष श्री. अर्जुन आंबी, ‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेचे श्री. योगेश केरकर, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा संयोजक श्री. अनिल दिंडे, ‘महाराज प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, श्री. अभिजित पाटील, ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.