‘कोरोना’ महामारीच्या काळात देहली येथे असलेला माझा सर्वांत लहान भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांची एक मुलगी यांना ‘कोरोना’ झाला होता. त्याची पत्नी आणि मुलगी त्या आजारातून लवकर बर्या झाल्या; पण भावाची ‘कोरोना’ची लक्षणे वाढत गेल्याने त्याला ‘स्टिरॉइड्स’ द्यावी लागली. त्या औषधांचा दुष्परिणाम असा झाला की, त्याच्या आजाराची गुंतागुंत वाढली आणि त्याला मानसिक आजार (सायकोसिस) झाला. तो कालावधी आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता.
१. भावाच्या आजारपणात त्याला साहाय्य करण्यासाठी देहली येथे जाण्याचे ठरवणे आणि तेथे जाण्यापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आध्यात्मिक उपाय वाढवा. सर्वकाही ठीक होईल’, असे सांगून आश्वस्त करणे : माझ्या भावाला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे; मात्र तो आता पुष्कळ वाढला होता. त्याचे मानसिक संतुलन संपूर्णपणे बिघडल्यामुळे मोठ्या आवाजात बोलणे, काहीही कारण नसतांना चिडचिड करणे, असे त्याच्याकडून होत होते. घरात भावाच्या समवेत वहिनी आणि त्यांच्या दोन लहान मुली (एक ७ वर्षांची आणि दुसरी २ वर्षांची) रहातात. त्यामुळे या आजारपणात त्यांना साहाय्य व्हावे, यासाठी मी आणि माझे यजमान देहली येथे जाण्याचे ठरवले. देहली येथे जाण्यापूर्वी आम्ही सद्गुरु बिंदाताईंना (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना) भेटायला गेलो. त्या वेळी त्यांनी आम्हाला ‘आध्यात्मिक उपाय वाढवा. सर्वकाही ठीक होईल. आम्ही सर्व तुमच्या समवेत आहोत. काळजी करू नका’, असे सांगून त्यांनी आम्हाला आश्वस्त केले.
२. भावाला होणार्या वाईट शक्तींच्या त्रासासाठी विविध आध्यात्मिक उपाय करतांना ‘केवळ प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत (ऑडिओ) लावल्यावर त्याचा त्रास नियंत्रणात येत आहे’, असे लक्षात येणे : देहली येथे पोचल्यावर माझ्या भावाची स्थिती गंभीर असल्याचे आमच्या लक्षात आले. संपूर्ण दिवस त्याला तीव्र आध्यात्मिक त्रास होत होते. त्यावर उपाय म्हणून संतांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ‘निर्गुण’ हा नामजप करायला आरंभ केला. त्या समवेत आम्ही त्याच्याकडून मीठ-पाण्याचे उपाय करून घेणे, देवतांची विविध स्तोत्रे मोठ्या आवाजात लावणे, सात्त्विक उदबत्ती लावणे, विभूती लावणे, परम पूज्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत (ऑडिओ) लावणे इत्यादी आध्यात्मिक उपाय करत होतो. हे उपाय चालू असतांना ‘केवळ परम पूज्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत (ऑडिओ) लावल्यावर माझ्या भावाला होणार्या वाईट शक्तीचा त्रास नियंत्रणात येत आहे’, हे आमच्या लक्षात आले.
३. आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या आवाजातील ध्वनीफीत लावल्यानंतर काही मिनिटांतच त्रास न्यून होणे आणि त्याने प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राला वाकून नमस्कार करणे : पुष्कळदा माझ्या भावाला होणार्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढल्यामुळे त्याला सांभाळणे आम्हाला अशक्य होत होते. त्या वेळी आमचा शरणागतभाव वाढत होता. आम्ही परम पूज्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत (ऑडिओ) लावल्यावर त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे माझ्या भावाला होणारा वाईट शक्तींचा त्रास नियंत्रणात येत असे. आमच्या लक्षात हेही आले की, ‘त्या त्रासाची तीव्रता वाढल्यावर आम्ही परम पूज्यांच्या आवाजातील ध्वनीफीत लावल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा त्रास उणावत असे.’ त्यानंतर तो परम पूज्यांच्या छायाचित्राला वाकून नमस्कार करत असे. ‘आमचे गुरुदेव हे साक्षात् श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे माझा भाऊच नाही, तर वाईट शक्तीही त्यांच्या समोर नतमस्तक होतात’, असे आम्हाला जाणवायचे. (‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे. – संकलक)
४. प.पू. डॉक्टरांनी शिकवलेल्या आध्यात्मिक त्रासाविषयीची सूत्रे वहिनीला सांगतांना पुष्कळ भावजागृती होणे : माझ्या वहिनीसाठी हे सर्व नवीन होते; कारण तिला वाईट शक्तींच्या त्रासाविषयी काहीही ठाऊक नव्हते. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला जे जे शिकवले, उदा. ‘आध्यात्मिक त्रास कसा ओळखायचा ? त्यावर उपाय कसे करायचे ? आणि साधकांना त्रास होत असतांना त्यांना साहाय्य कसे करायचे ?’ यांविषयीची सूत्रे आम्ही तिला सांगितली. तिला सूत्रे सांगत असतांना प्रत्येक वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती.
५. आध्यात्मिक त्रास वाढलेल्या भावाची काळजी घेणे आव्हानात्मक वाटणे आणि गेल्या अनेक वर्षांपासून अखंड अन् निरपेक्षपणे आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांची काळजी घेणार्या प.पू. डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञतेने मन भरून येणे : ‘प.पू. गुरुदेवांसारखे गुरु आम्हाला लाभावेत, यासाठी आम्ही असे काय केले ?’, असे आम्हाला वाटायचे. त्यांनी आध्यात्मिक त्रासाविषयी सांगितलेली सूत्रे इतर कोणत्याही गुरूंनी सांगितलेली नाहीत. हा विषय सांगून त्यांनी अखिल मानवजातीला नवसंजीवनीच दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प.पू. डॉक्टर अखंड आणि निरपेक्षपणे आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांची काळजी घेत आहेत. आम्हाला केवळ माझ्या भावाची काळजी घ्यायची होती. त्याचा आध्यात्मिक त्रास दिवसभरात कधीही वाढत असल्याने त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे लागत होते. त्यामुळे त्याची काळजी घेणे आमच्यासाठी एक आव्हानच होते. ‘परम पूज्य डॉक्टरांनी त्रास असणार्या असंख्य साधकांसाठी नामजपादी उपाय करून त्यांची काळजी कशी घेतली असेल ?’, याची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळे आमचे मन अपार कृतज्ञतेने भरून येत होते.
६. ‘आध्यात्मिक त्रासाचा अभ्यास कसा करायचा ?’, हे परम पूज्य डॉक्टरांनी शिकवल्यामुळेच भावाला त्रास देणारी वाईट शक्ती ज्ञानमार्गी असून ती नादाच्या (आकाशतत्त्वाच्या) माध्यमातून सूक्ष्मातून लढत असल्याचे लक्षात येणे; मात्र परम पूज्यांच्या वाणीतील उच्चतम चैतन्यापुढे ती काहीही करू न शकणे : परम पूज्य गुरुदेवांनी आम्हा साधकांना सहज आणि सोपे, असे किती तरी आध्यात्मिक स्तरावरील उपाय शिकवले आहेत. केवळ परम पूज्य गुरुदेवांनी ‘आध्यात्मिक त्रासाचा अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकवल्यामुळेच ‘माझ्या भावाला त्रास देणार्या शक्तीचे वागणे कसे आहे ?’, ते आम्हाला समजू शकले. ‘ती शक्ती ज्ञानमार्गी असून नादाच्या (आकाशतत्त्वाच्या) माध्यमातून सूक्ष्मातून लढत आहे’, असे आमच्या लक्षात आले. ‘परम पूज्यांची ध्वनीफीत लावल्यावर त्यांच्या वाणीतील चैतन्य उच्चतम स्तराचे असल्याने त्या चैतन्यापुढे ती वाईट शक्ती काहीही करू शकत नव्हती’, हेही आम्ही पाहिले.
७. भावाच्या उपचारासाठी स्थानिक आधुनिक वैद्यांचा शोध घेतांना प.पू. डॉक्टरांच्या कृपेने भावाच्या घरापासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर असणारे मानसोपचार तज्ञ आणि त्यांचे मोठे, स्वच्छ अन् गर्दी नसलेले रुग्णालय सापडणे आणि त्याद्वारे गुरुदेवांनी ‘कोरोना’पासूनही रक्षण करणे : देहली येथे जाण्यापूर्वी आम्ही गोव्यातील आधुनिक वैद्य आणि साधक यांच्या साहाय्याने भावाचे उपचार चालू केले होते; मात्र भावाच्या त्रासाची स्थिती पहाता आम्ही त्याच्यासाठी देहली येथील स्थानिक आधुनिक वैद्यांचे उपचार घेण्याचे ठरवले. त्यानुसार आम्ही देहली येथील आधुनिक वैद्यांना शोधू लागलो. अमेरिकेत असणार्या माझ्या मोठ्या भावाने गुडगाव, देहली येथील एका मानसोपचार तज्ञाचा पत्ता शोधून काढला. ते मानसोपचार तज्ञ आणि त्यांचे रुग्णालय माझ्या भावाच्या घरापासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर होते. केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला ते मिळाले; कारण ‘कोरोना’ महामारीच्या काळात हे सर्व शोधून काढणे अवघड होते. त्यांचे रुग्णालय मोठे आणि स्वच्छ होते, तसेच तेथे फारशी गर्दी नव्हती. अशा प्रकारे गुरुदेवांनी एका सुरक्षित रुग्णालयात पाठवून आमचे ‘कोरोना’पासूनही रक्षण केले. शिष्य कुठेही गेला, तरी गुरूंचे त्याच्याकडे लक्ष असतेच. केवळ तोच (शिष्यच) नाही, तर त्याच्या कुटुंबियांचेही ते रक्षण करतात. हीच ‘गुरुकृपा’ आहे. (क्रमश:)
– गुरुदेवांच्या पवित्र चरणी समर्पित
एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|