भारतातील प्रमुख कालगणना !

‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत. अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.

श्री. राज कर्वे

१. कलियुग संवत्

भारतात प्राचीन काळापासून युगपद्धती अस्तित्वात आहे. ही एक वैश्विक कालगणना आहे. या युगपद्धतीमुळे ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत किती काळ लोटला ? हे कळते. सध्याच्या कलियुगाचा आरंभ इसवी सन पूर्व ३१०२ मध्ये मानला जातो. कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ सहस्र वर्षे आहेत. इसवी सनाच्या वर्ष २०२४ मधील चैत्र शुक्ल प्रतिपदेला ‘कलियुग वर्ष ५१२६’ चालू होईल.

२. विक्रम संवत्

ग्रहमाला

उज्जैनला सम्राट विक्रमादित्याने इसवी सन पूर्व ५७ मध्ये ‘विक्रम संवत्’ ही कालगणना आरंभ केली. ही कालगणना परकीय शक लोकांना पराभव केल्याच्या प्रीत्यर्थ चालू करण्यात आली. बहुतांश उत्तर भारतात ही कालगणना प्रचलित आहे. यात वर्षाचा आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो; पण महिने पौर्णिमान्त असतात, म्हणजे एका पौर्णिमेपासून दुसर्‍या पौर्णिमेपर्यंत १ मास असतो. त्यामुळे कृष्ण पक्ष आधी आणि शुक्ल पक्ष नंतर येतो. इसवी सनाच्या वर्ष २०२४ मधील चैत्र शुक्ल प्रतिपदेला ‘विक्रम संवत् २०८१’ चालू होईल.

३. शालिवाहन शक

विक्रम संवतानंतर १३५ वर्षांनी ‘शालिवाहन शक’ आरंभ झाला. ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांमध्ये शालिवाहन शकाच्या एखाद्या वर्षापासून गणिताचा आरंभ केलेला असतो. दक्षिण भारतात शालिवाहन शक बहुतांश प्रचलित आहे. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय दिनदर्शिके’तही शालिवाहन शकानुसार कालगणना दिलेली असते. यात वर्षाचा आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो; पण महिने अमान्त असतात, म्हणजे एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंत १ मास असतो. त्यामुळे शुक्ल पक्ष आधी आणि कृष्ण पक्ष नंतर येतो. इसवी सनाच्या वर्ष २०२४ मधील चैत्र शुक्ल प्रतिपदेला ‘शालिवाहन शक १९४६’ चालू होईल.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.३.२०२४)