Maldives Thanks India : भारताने विक्रमी निर्यात केल्यावरून मालदीवने मानले आभार !

गेल्या ४० वर्षांत सर्वांत मोठी निर्यात !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर व मालदीवचे परराष्ट्रमंत्री मूसा जमीर

माले (मालदीव) – मालदीवचे परराष्ट्रमंत्री मूसा जमीर यांनी भारत सरकार आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे आभार मानले आहेत. भारताने मालदीवसाठी निर्यातीवरील प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वर्ष १९८१ नंतर ही सर्वांत मोठी निर्यात असणार आहे. यांतर्गत तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, बटाटे, कांदे आणि डाळ यांसारख्या वस्तू मालदीवला निर्यात करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

भारत मालदीवला आता १ लाख २४ सहस्र २१८ टन तांदूळ, १ लाख ९ सहस्र १६२ टन गव्हाचे पीठ, ६४ सहस्र ४९४ टन साखर, २१ सहस्र ५१३ टन बटाटे, ३५ सहस्र ७४९ कांदे आणि ४२.७५ कोटी अंडे देणार आहे. भारताच्या या उदारतेवरून मूसा जमीर यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी याविषयी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे आमच्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीचे, तसेच द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्य आणखी वाढवण्याच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या ‘नेबरहुड फर्स्ट’ (शेजारधर्म पाळण्यास प्राधान्य) आणि सागर धोरणे यांसाठी कटीबद्ध आहे. सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास हे भारताचे धोरण आहे. महासागर क्षेत्रातील सागरी सहकार्याचे भारताचे धोरण आहे.

संपादकीय भूमिका

मालदीवचे चीनधार्जिणे धोरण असले, तरी भारताची नूतन परराष्ट्रनीती ही स्वार्थांध देशांसारखी नाही, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारत जागतिक नेता होण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे, हेच यातून लक्षात येते !