आचारसंहितेच्या काळात ‘मेट्रो’च्या खांबांवरील विज्ञापनांवर कारवाई करा !

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘महामेट्रो’ प्रशासनाला पत्र !

पिंपरी (पुणे) – ‘मेट्रो’च्या मार्गांवरील खांब तुमच्या मालकीचे असून त्यावर आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही विज्ञापन करू देऊ नका. विज्ञापन लावल्यास तात्काळ कारवाई करा, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून ‘महामेट्रो’ प्राधिकरणाला देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये पिंपरी ते हॅरिस ब्रिज दरम्यान ‘महामेट्रो’ धावते. या मार्गावरील खांबांवर नेहमीच राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी विविध राजकीय विज्ञापने करत असतात. त्यावर महापालिकेकडून सातत्याने कारवाई केली जाते. शहरातील एका आमदाराच्या मुलानेच नुकतेच ‘मेट्रो’च्या खांबांवर विज्ञापन लावले होते. त्यावर आकाशचिन्ह विभागाने कारवाई केली होती. सध्या देशासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिका हद्दीमध्ये आचारसंहितेचा कुठेही आणि कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन काळजी घेत आहे.