भरुच (गुजरात) : भरुच ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी सत्र न्यायालयाने आदिल अब्दुल पटेलचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आदिल अब्दुल पटेल याने ‘इन्स्टाग्राम’वर बनावट खाते सिद्ध करून हिंदु मुलीला अडकवले. त्याने मुसलमान असूनही ‘आर्य पटेल’ असे हिंदु नाव धारण करून अनुमाने ४ वर्षे पीडित हिंदु मुलीशी प्रेमसंबंध ठेवले. जानेवारी २०२४ मध्ये पीडित हिंदु मुलीला जेव्हा सत्य समजले, तेव्हा तिने आदिलचे गाव गाठले आणि त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या कह्यात दिले.
हे आजच्या पिढीचे डोळे उघडणारे प्रकरण ! – न्यायालय
आदिलने मार्च २०२४ मध्ये जामिनासाठी अर्ज प्रविष्ट (दाखल) केला होता. सरकारी अधिवक्त्यांनी जामीन अर्जाला विरोध केला. ‘अशा गुन्हेगाराची जामिनावर सुटका झाली, तर तो पुन्हा या कृत्याची पुनरावृत्ती करू शकतो आणि इतर निष्पाप मुली त्याला बळी पडू शकतात’, असा युक्तीवाद त्यांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरत ‘हे आजच्या पिढीसाठी डोळे उघडणारे प्रकरण आहे. आदिलची जामिनावर सुटका झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे सांगत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.