शिरस्‍त्राणसक्‍ती हवीच !

सर्वत्र अनेक ठिकाणी रस्‍त्‍यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्‍त्‍यातील खड्डे बुजवण्‍यात आले, रस्‍त्‍यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्‍यूचा आकडा काही न्‍यून होतांना दिसत नाही. या अपघातांचा सातारा पोलीस दलाने आढावा घेतल्‍यानंतर चारचाकी वाहन चालवतांना ‘सीटबेल्‍ट’ (वाहनातील आसंदीवर लावायचा पट्टा) न लावल्‍यामुळे, तर दुचाकी चालवतांना शिरस्‍त्राण (हेल्‍मेट) न घातल्‍यामुळे अनेकांचे जीव गेल्‍याचे समारे आले आहे. मार्च २०२२ मध्‍ये परिवहन आयुक्‍तांनी शिरस्‍त्राण आणि ‘सीटबेल्‍ट’ बंधनकारक केले; मात्र याविषयी वेळोवेळी मोठी जागृती आणि प्रबोधन सप्‍ताह साजरे करूनही वाहनचालकांमध्‍ये प्रचंड उदासीनता असल्‍याचे दिसून येते. ‘सोय होण्‍याऐवजी गैरसोय अधिक होते’, अशी कारणे सांगून नागरिकांकडून शिरस्‍त्राणसक्‍तीच्‍या निर्णयाला केराची टोपली दाखवण्‍यात आली. याविषयी पोलीस आणि प्रशासन यांनीही ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ ठेवणेच पसंत केले. पोलिसांनी केवळ दंडाच्‍या पावत्‍या देण्‍याऐवजी शिरस्‍त्राण विकत घेण्‍यासाठी सक्‍ती करावी, तसेच जिल्‍हा प्रशासनानेही पोलीसदलाच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गांभीर्याने शिरस्‍त्राणसक्‍तीची कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.

गत वर्षभराचा विचार केला, तर रस्‍ते अपघातामध्‍ये एकट्या सातार्‍यासारख्‍या जिल्‍ह्यात ५०१ नागरिकांना त्‍यांचे जीव गमवावे लागले आहेत. या तुलनेत ४५ हत्‍येचे, तर ४८ आत्‍महत्‍येचे प्रकार घडले आहेत. यातून रस्‍ते अपघातातील मृत्‍यूचे प्रमाण सर्वाधिक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सर्वत्र थोडीफार अशीच स्‍थिती आहे. रस्‍ते अपघातामध्‍ये मृत्‍यू झाल्‍यानंतर ‘चालकाने शिरस्‍त्राण घातले होते का ?’, ‘सिटबेल्‍ट लावला होता का ?’, याविषयी कोणतीही नोंद पोलीस पंचनामा किंवा प्रथमदर्शी माहिती अहवालात केली जात नाही. अशी नोंद पोलिसांनी केली, तर मृत्‍यू झालेल्‍या चालकाच्‍या नातेवाइकाला, विमा आस्‍थापनाला ही कागदपत्रे देणे अधिक लाभदायक ठरू शकते. पोलीसदलाने याविषयी सकारात्‍मक पाऊल उचलणे आवश्‍यक आहे. रस्‍ते अपघातामध्‍ये चालकाला जीव गमवावा लागला, तरी विमा आस्‍थापन ‘चालकाचा मृत्‍यू झाला, त्‍या वेळी त्‍याने हेल्‍मेट घातले होते का ? सीटबेल्‍ट लावला होता का ?’, याची पडताळणी करते. त्‍यामुळे शिरस्‍त्राण आणि ‘सीटबेल्‍ट’ यांमुळे जीव तर वाचतोच; परंतु एखाद्याचा जीव गेला, तरी विमा आस्‍थापनाकडे हानीभरपाई मागण्‍यासाठी आवेदन करता येते. हाच भाग लक्षात घेऊन सर्वत्रच्‍या जिल्‍हा पोलिसांनी शिरस्‍त्राणसक्‍ती करण्‍याच्‍या कार्यवाहीसाठी पाऊल उचलणे आवश्‍यक आहे.

– श्री. राहुल देवीदास कोल्‍हापुरे, सातारा