Bengaluru Water Crisis : होळीच्या दिवशी ‘रेन डान्स’ किंवा ‘पूल डान्स’ यांचे आयोजन करू नका !

बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन

(पूल डान्स म्हणजे जलतरण तलावाच्या ठिकाणी नृत्य करणे)
(‘रेन डान्स’ म्हणजे मोठ्या शॉवरच्या पाण्याखाली नृत्य करणे)

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू पाणी पुरवठा आणि सांडपाणी मंडळाने होळीच्या दिवशी व्यावसायिक ‘पूल डान्स’ किंवा ‘रेन डान्स’ करू नये, असे आवाहन केले आहे. याला विरोध होत आहे. शहरात घरे आणि निवासी भागांत होळी खेळण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

१. मंडळाने म्हटले आहे की, होळीच्या दिवशी ‘रेन डान्स’ किंवा ‘पूल डान्स’ आयोजित केल्यास सहभागींनी कावेरी नदी किंवा कूपनलिका (बोअरवेल) यांचे पाणी वापरू नये. यासाठी त्यांनी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पावसाचे साठवून ठेवलेले पाणी) आणि भूजल पुनर्भरण यांना प्राधान्य देण्याचे मंडळाने सांगितले आहे.

२. मंडळाचे अध्यक्ष रामप्रसाद मनोहर म्हणाले की, लोकांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लोक पाण्याचा अपव्यय करतात. मंडळाकडून पुरवल्या जाणार्‍या १०० लिटर पाण्यासाठी मंडळ ९० रुपये खर्च करते, तर ग्राहकांकडून केवळ ४५ रुपये मिळतात.

लोकांना पाण्याचे महत्त्व कळले पाहिजे आणि त्यांनी ते जपून वापरावे.

संपादकीय भूमिका

होळीनिमित्त होणार्‍या पाण्याच्या अपव्ययाच्या प्रकरणी गुन्हा नोंद करून संबंधितांकडून मोठा दंड वसूल करण्याचा कायदाच केला पाहिजे, तरच असले प्रकार थांबवता येतील !