America On CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कार्यवाहीवरून अमेरिकेच्या खासदाराने व्यक्त केली चिंता !

पाकिस्तानातील हिंदूंविषयी अमेरिकेला सहानुभूती का वाटत नाही ? – अमेरिकेतील हिंदु संघटनेकडून प्रत्युत्तर !

वॉशिंग्टन (अमेरिका) – वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे मला खूप त्रास झाला आहे. मला विशेषत: भारतात रहाणार्‍या मुसलमान समुदायावर या कायद्याच्या संभाव्य प्रभावाबद्दल काळजी वाटते. (या कायद्यात मुसलमानांना घाबरण्यासारखे काहीही नाही, हे भारतातील मुसलमानच आता सांगू लागले असतांना अमेरिकेने अशा प्रकारची हास्यास्पद विधाने करू नयेत ! – संपादक) रमझानच्या पवित्र महिन्यात त्याची कार्यवाही केली जात असल्याने प्रकरण अधिकच चिघळते, असे विधान अमेरिकेचे सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आणि ‘हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटी’चे अध्यक्ष बेन कार्डिन यांनी केले आहे. (‘पवित्र’ रमझानच्या काळातही भारताच्या शेजारी इस्लामी देशांमध्ये हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होतात, हे कार्डिन यांना दिसत नाही का ? – संपादक) ते पुढे म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील सखोल संबंधांमुळे, धर्माची पर्वा न करता सर्व लोकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्याच्या सामायिक मूल्यांवर आधारित आमचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे.

१. कार्डिन यांच्या विधानावर अमेरिकेतील हिंदु संघटना ‘हिंदुपॅक्ट’चे संस्थापक आणि सह-संयोजक अजय शहा म्हणाले की, सीएएचा भारतातील कोणत्याही नागरिकावर परिणाम होत नाही. भारताच्या शेजारी देशांमध्ये हिंदु अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जातो आणि त्यांचा छळ केला जातो. अमेरिकी म्हणून आम्ही निराश आहोत की, अत्याचारित लोकांच्या मानवी हक्कांसाठी उभे रहाण्याऐवजी आमच्या सरकारने या मानवतावादी प्रयत्नांना विरोध करणे निवडले आहे.

२. ‘हिंदुपॅक्ट’च्या सह-संयोजक दीप्ती महाजन म्हणाल्या की, पाकिस्तानमधील हिंदु, शीख आणि ख्रिस्ती अल्पसंख्यांक समुदायातील लहान मुलींच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती नसणे, हे धक्कादायक आहे. ‘युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स कमिशन’च्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी सरासरी १० वर्षांखालील १ सहस्र मुलींचे अपहरण केले जाते, त्यांचे धर्मांतर केले जाते आणि बळजोरीने लग्न केले जाते. या हृदयद्रावक गुन्ह्यात सहभागी झाल्याबद्दल पाकिस्तान सरकारचा निषेध करण्याऐवजी परराष्ट्र मंत्रालय या निष्पाप पीडितांना साहाय्य करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांवर टीका करत आहे.

३. ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’चे व्ही.एस्. नायपॉल म्हणाले की, सीएए कायदा धर्मनिरपेक्षता, शांतता आणि मानवता धोक्यात असलेल्या आमच्या शेजारील इस्लामी देशांमध्ये अमानुषता, छळ, सक्तीचे धर्मांतर, हत्या, बलात्कार आणि सर्व प्रकारचे  अत्याचार यांना सामोरे जात असलेल्या अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेकडे लक्ष देते.

संपादकीय भूमिका

अमेरिका आणि तिचे खासदार यांनी भारतातील कायद्यांमविषयी नाक खुपसू नये. भारताने यापूर्वीच अमेरिकेला हे सांगितले असतांना अमेरिकेला कळत नसेल, तर आता भारताने अमेरिकेला कळेल अशा शब्दांत सांगितले पाहिजे !