Pakistan Dangerous To Shia Muslims : पाकिस्तान शिया मुसलमानांंसाठी धोकादायक ठिकाण !

  • ‘इस्लामोफोबिया’वरून (इस्लामविषयीच्या द्वेषावरून) जगाला उपदेश करणार्‍या पाकला काश्मिरी कार्यकर्त्यांनी दाखवला आरसा !

  • पाकिस्तानच्या तुलनेत जम्मू-काश्मीर एक उज्ज्वल ठिकाण असल्याचेही विधान !

काश्मिरी कार्यकर्ते जावेद बेग

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – इस्लामी जगतात स्वतःचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानला एका काश्मिरी कार्यकर्त्याने आरसा दाखवला आहे. काश्मिरी कार्यकर्ते जावेद बेग यांनी जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या अधिवेशनात पाकिस्तानमधील शिया मुसलमानांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी ‘पाकिस्तान हे शिया लोकांसाठी धोकादायक ठिकाण आहे’ असे सांगितले. बेग यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील शिया पश्तूनी लोकांच्या भीषण परिस्थितीवर चर्चा केली. तसेच त्यांनी पाकिस्तानमधील परिस्थितीची काश्मीरमधील प्रगतीशी तुलना केली. विशेष म्हणजे बेग यांनी ही परिस्थिती उघड करण्यापूर्वी आदल्या दिवशी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत ‘इस्लामोफोबिया’बाबत (इस्लामविषयीच्या द्वेषाबाबात) ठराव मांडला होता.

१. बेग यांनी सुरक्षा परिषदेत जे सांगितले त्याविषयी ‘एक्स’वर माहिती देतांना लिहिले की, पाकिस्तानमध्ये शिया लोकांचा छळ एवढा वाढला आहे की, पाकिस्तानी संस्था, न्यायव्यवस्था आणि माध्यमे त्यांना न्याय मिळवून देण्यास कुचकामी ठरली आहेत. पाकिस्तानच्या तुलनेत जम्मू-काश्मीर हे एक उज्ज्वल ठिकाण बनले आहे, जिथे आंतर-धर्मीय सलोखा, प्रगती आणि सर्वांचे आर्थिक कल्याण भक्कम झाले आहे. हे सांगण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही.

२. बेग यांनी पाराचिनारमधील शिया मुसलमानांना लक्ष्य करत चालू असलेल्या सांप्रदायिक हिंसाचाराकडे लक्ष वेधले. पाराचिनारची बहुसंख्य लोकसंख्या तुरी आणि शिया बंगश पश्तून जमातींची आहे. देवबंदी आणि सलाफी विचारसरणी त्यांना काफिर (मूर्तीपूजक) मानतात. गेल्या ३ दशकांपासून या शिया जमाती या विचारसरणीचे पालन करणार्‍या आतंकवादी संघटनांच्या हातून जातीय हिंसाचाराला बळी पडत आहेत. बेग यांनी या वेळी वर्ष २००७ च्या युद्धाचाही उल्लेख केला ज्यात सुन्नी आतंकवाद्यांकडून सहस्रो शिया मारले गेले होते.

संपादकीय भूमिका

  • भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !