सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू !

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघासाठी ७ मे २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यादृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत केले. लोकसभा निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी किशोर तावडे पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करतांना (डावीकडून तिसरे)

या वेळी जिल्हाधिकारी तावडे यांनी सांगितले की,

१. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना १२ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २० एप्रिल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक २२ एप्रिल आहे.

२. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी, अशा ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पोलिसांनी संचलन केले. सावंतवाडी येथे करण्यात आलेल्या संचलनात ९ अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. कणकवली आणि कुडाळ शहरांतही पोलिसांनी संचलन केले.