|
कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग)- ‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना चुकीच्या मापाचे गणवेश देण्यात आल्याने ते शाळेतच पडून आहेत. विद्यार्थिनींसाठीच्या गणवेशाचे कापड देण्यात आले नाही, तसेच शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी दुसरा गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यामध्ये नाहक संघर्ष होत आहे. त्यामुळे या योजनेच्या विरोधात चुकीच्या मापांचे गणवेश घेऊन शाळांचे मुख्याध्यापक ३० डिसेंबरला दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करणार आहेत, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कुडाळ तालुका शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.
याविषयीचे निवेदन समितीच्या वतीने गटविकास अधिकारी व्ही.एम्. नाईक यांना १६ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शशांक आटक, सचिव महेश गावडे, प्रसाद वारंग आदी उपस्थित होते.
या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश दिले जाणार होते. त्यापैकी एका गणवेशाचे कापड देऊन त्याची शिलाई शाळास्तरावर करून घ्यायची होती, तर दुसरा गणवेश राज्यशासन स्वतः शिवून देणार होते. मुळात गणवेश मापात आहेत कि नाही, हे मुख्याध्यापक कसे ठरवणार ? प्रथम दिलेले गणवेश मापात नसल्याने ते शाळेतच पडून आहेत. ही परिस्थिती बहुतांश शाळांची आहे. विद्यार्थी शाळा सोडून नवीन शाळेत जायची वेळ आता आली आहे. विद्यार्थ्यांची इयत्तावार शारीरिक जडणघडण लक्षात न घेता गणवेश शिवून देणे हे अत्यंत चुकीचे आहे. याविषयी कोणत्याही स्तरावर या चुकीचे दायित्व मुख्याध्यापक स्वीकारणार नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे सर्व प्रकारचे आदेश बहुतांश करून ‘व्हॉट्सअॅप’द्वारे मुख्याध्यापकांना पाठवले जातात. त्याची प्रत शाळांना दिली जात नाही. या सर्व गोष्टींच्या विरोधात हे आंदोलन आहे, असे निवेदनात म्हटले आहे.