जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘ग्लोबल स्पिरिच्युअ‍ॅलिटी महोत्सवा’चे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन !

भाग्यनगर (तेलंगाणा) – संकुचित श्रद्धा आणि पंथ लोकांमध्ये फूट पाडत असल्याचे जग पहात आले आहे. खरेतर आपल्याला मूळ श्रद्धेला दोष देऊन चालणार नाही. समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही. आपण एकमेकांशी पुन्हा जोडले गेले पाहिजे. जेव्हा आपण एकमेकांशी जोडले जाऊ, तेव्हाच आपण देवाशी पुन्हा जोडले जाऊ शकतो, असे उद्गार ‘हार्टफुलनेस’ या आध्यात्मिक संस्थेचे मार्गदर्शक दाजी (कमलेशजी पटेल) यांनी येथे काढले. ते केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने भाग्यनगरजवळ असलेल्या चेगुर येथील ‘कान्हा शांती वनम्’ येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाच्या (‘ग्लोबल स्पिरिच्युअ‍ॅलिटी महोत्सवा’च्या) उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सांस्कृतिक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार रंजना चोप्रा, ‘इस्कॉन’चे गौर गोपाल दास, ‘रामकृष्ण मिशन’चे स्वामी आत्मप्रियानंदजी, ‘ब्रह्मकुमारी’ संप्रदायाच्या उषा बहन आणि प.पू. चिन्ना जियार स्वामीजी उपस्थित होते. कार्यक्रमाला ३०० हून अधिक आध्यात्मिक संघटनांचे संत आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

‘हार्टफुलनेस’ या आध्यात्मिक संस्थेचे मार्गदर्शक दाजी (कमलेशजी पटेल)

दाजी पुढे म्हणाले की, आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह ! खरा आध्यात्मिक साधक याला बळी पडणार नाही. साधक म्हणतो की, त्याला देव आहे कि नाही, हेसुद्धा माहिती नाही. त्याला त्याच्या अंत:करणात देवाच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायची असते.


आतंकवाद नष्ट झाल्याविना समाज आंतरिक शांततेकडे वळू शकत नाही ! – प.पू. चिन्नाजीयर स्वामीजी

प.पू. चिन्नाजीयर स्वामीजी

आज जगभरातील लोक आतंकवादाच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. जर आतंकवादाचे रोपटे असते, तर आपण आंतरिक शांततेकडे लक्ष देऊ शकलो असतो; परंतु आज आतंकवाद सर्वत्र मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अशा वेळी राजसत्ता आणि प्रशासन यांनी या आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर उपाय योजले पाहिजेत. ते झाले, तरच आपण आंतरिक शांततेकडे वळू शकतो. अन्यथा दबाव आणि आतंकवाद असतांना आपण आंतरिक साधनेकडे कसे लक्ष देणार ? समाजाला सुरक्षितता प्रदान करता आली पाहिजे. भारतभूमी ही श्रेष्ठ संस्कृती आणि सभ्यता यांची भूमी होती. तिने जगातील सर्व उपासनापद्धतींना स्वीकारले. ‘आपण आपल्या उपासनेवर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि जगातील अन्य व्यवस्थांकडे आदराने पाहिले पाहिजे’, यावर भारतियांचा विश्‍वास आहे.  सुदैवाने आज तसे शासन भारताला लाभले आहे. आज शासन समाजाला सर्व प्रकारे सुरक्षितता प्रदान करत आहे. जीवनाची सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे, अन्यथा समाज प्रलोभनांना बळी पडतो. आताच्या शासनामुळे आपण आंतरिक साधनेकडे लक्ष देऊ शकतो. अध्यात्माचे एवढे पदर आहेत. आपण प्रत्येक विचारसरणीचा आदर केला पाहिजे. आपले अंतिम ध्येय हे आंतरिक शांतीपासून जागतिक शांततेपर्यंत जाणे, असे असले पाहिजे.’’


ज्या गोष्टी आपण पालटू शकत नाही, त्यांवर ऊर्जा खर्च करणे हितावह नाही ! – गौर गोपाल दास

गौर गोपाल दास

आपल्यासमोर असलेली आव्हाने, समस्या आदींमुळे आपल्या आंतरिक शांतीला धक्का पोचतो. ‘समस्यांचे निराकरण म्हणजे शांतता’, अशी आपण शांततेची समजूत करून ठेवली आहे. मुळात समस्या कधीच संपणार नाहीत. त्यामुळे तुम्हालाच तुमची शांतता शोधावी लागेल. मीच शांत नसलो, तर जग कसे शांत होईल ? ज्या गोष्टी आपण पालटू शकत नाही, त्यांवर ऊर्जा खर्च करणे हितावह नाही. जर तुम्ही श्रद्धाळू असाल, तर भगवंताकडे पहा, जर अंधश्रद्ध असाल, तर ब्रह्मांडाशी स्वत:ला जोडा. कुणाशीतरी स्वत:ला जोडणे महत्त्वाचे !


मानवाने आध्यात्मिक प्रतिकारशक्ती निर्माण करणे आवश्यक ! – उषा बहन, ब्रह्मकुमारी

उषा बहन, ब्रह्मकुमारी

आपल्याला आहे त्या ठिकाणी राहून समस्यांनी घेरलेल्या जीवनातच शांतता अनुभवयाची आहे. यासाठी आपल्याला स्वत:त आध्यात्मिक प्रगल्भता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानेच आपण आंतरिक शांतता अनुभवू. आध्यात्मिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली की, आपल्याला मानसिक अथवा भावनिक स्तरावर कोणतीच समस्या त्रास देऊ शकत नाहीत. भगवद्गीतेत सांगितलेच आहे की, जे काही घडले, ते माझ्या चांगल्यासाठीच होते आणि जे घडेल, तेही चांगलेच घडेल ! जीवनाकडे या दृष्टीकोनातून पहाण्यास आपण शिकले पाहिजे.’




सनातन संस्थेचाही सहभाग

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती

कार्यक्रमाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती.