Kalaram Temple Notice Withdrawn : हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

ध्वनीक्षेपकाच्या प्रकरणी नाशिकमधील काळाराम मंदिराला नोटीस दिल्याचे प्रकरण !

नाशिक – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईमागील पक्षपाती भूमिका उघड केल्यानंतर श्री काळाराम मंदिराला ध्वनीक्षेपकाप्रकरणी पाठवलेली कारवाईची नोटीस पोलिसांनी मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘श्री काळाराम मंदिरात भक्तीगीते लावली जात असल्याच्या प्रकरणी नोटीस पाठवणारे सकाळी ५ ते ६ या वेळेत ध्वनीप्रदूषण कायद्याचा भंग करणार्‍या मशिदींवर कारवाई करण्याचे धारिष्ट दाखवतील का ?’, असा प्रश्‍न १२ मार्च या दिवशी ‘एक्स’द्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर तक्रारदाराने तक्रार मागे घेतली असल्यामुळे नोटीस मागे घेत असल्याची माहिती पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दूरभाषवरून दिली.

पंचवटी येथील एका नागरिकाने ७ मार्च या दिवशी पंचवटी पोलीस ठाण्यात श्री काळाराम मंदिरात प्रतिदिन सकाळी ६ ते ७ या वेळेत ध्वनीक्षेपक लावला जात असल्याच्या विरोधात लेखी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ‘या आवाजामुळे स्थानिकांना त्रास होतो, तसेच इयत्ता १० आणि १२ वी ची परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. सर्वांची झोपमोड होते’, असे तक्रारीत म्हटले होते. यानंतर पोलिसांनी ‘मंदिरातील ध्वनीक्षेपक बंद करावा’, अशी नोटीस पाठवली होती.

संपादकीय भूमिका

मंदिरांवर कारवाई; मात्र शेकडो तक्रारीनंतरही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई नाही, हा पोलिसांचा पक्षपातीपणाच नव्हे का ?