Miscreants Set Fire Temple Chariot : तुमकुरू (कर्नाटक) येथे ८०० वर्षे जुन्या मंदिराचा रथ अज्ञातांनी जाळला !

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कर्नाटक देवस्थान, मठ आणि धार्मिक संस्था  महासंघाची मागणी

जाळलेला रथ

तुमकुरू (कर्नाटक) – तुमकुरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील निट्टूरू गावात ८०० वर्ष जुन्या चोल काळातील श्री कल्लेश्‍वर स्वामी देवालयातील रथ अज्ञातांनी जाळला. ही घटना १२ मार्च या दिवशी घडली. हे मंदिर धर्मादाय खात्याच्या सूचीतील ‘सी’ दर्जाचे मंदिर आहे. येथे २० मार्चपासून जत्रेला प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या सिद्धतेपूर्वी ही घटना घडली. या घटनेच्या संदर्भात उत्तर भारतातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

या संदर्भात कर्नाटक देवस्थान, मठ आणि धार्मिक संस्था महासंघाचे राज्य संयोजक श्री. मोहन गौडा यांनी प्रसारित केलेल्या निवेदनात, ‘ही घटना अत्यंत गंभीर असून या मागे अपराधी कोण आहेत ?’, ‘कोणत्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे ?’, ‘यामागे कोणते षड्यंत्र आहे ?’, याचा शोध घेण्यात यावा. अपराध्यांना तत्परतेने अटक करण्यात यावी. सरकार हिंदूंच्या मंदिरांकडून कर वसूल करत आहे; परंतु त्यांचे संरक्षण करत नाही, हे अत्यंत निषेधार्ह आहे. मंदिरांच्या जत्रेला सरकारने संरक्षण दिले पाहिजे’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! ‘काँग्रेसला सत्तेवर बसवल्यावर काय होते ?’, हे हिंदूंना आता लक्षात आले असेल, अशीच अपेक्षा करता येईल !