Ramnavami Holiday Bengal : बंगालमध्ये प्रथमच रामनवमीची सुटी घोषित !

ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने रामनवमीनिमित्त १७ एप्रिलला सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. तृणमूल सरकारने वर्ष २०११ पासून राज्यात सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. गेल्या काही वर्षांपासून बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीही रामनवमीच्या मिरवणुकांच्या वेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) याची चौकशी करत आहे.

भाजपच्या दबावाखाली रामनवमीच्या सुटीचा निर्णय !  – भाजपचा दावा

राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपच्या दबावाखाली ममता बॅनर्जी सरकारने रामनवमीच्या सुटीचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करतांना लिहिले की, जानेवारी मासात मी  रामनवमीला सुटी न दिल्याने राज्य सरकारवर टीका केली होती, आज राज्य सरकारला सुटी घोषित करणे भाग पडले.

भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आणि बंगालसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अमित मालवीय यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी हिंदुविरोधी प्रतिमा सुधारण्यासाठी हे केले आहे. खूप उशीर झाला असला, तरी महत्त्वाचे म्हणजे रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी.

संपादकीय भूमिका

अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे, हे स्पष्ट आहे !