सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी करण्यामागील जाणवलेले कारण‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी का केले आहे ?’, हे आता माझ्या लक्षात आले; कारण ‘स्त्रियाही संत, गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु’ या पदांवर जाऊन आध्यात्मिक कार्य करू शकतात’, याची निश्चिती परात्पर गुरुदेवांना आहे. परात्पर गुरुदेवांनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर दाखवलेला विश्वास त्या १०० टक्के सार्थ करून दाखवत आहेत’, हेही माझ्या लक्षात येत आहे.’ – श्री. मधुसूदन कुलकर्णी |
‘२२.३.२०२० या दिवशी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सरकारने दळणवळण बंदी घोषित केली. तेव्हा माझी पत्नी दुसर्या गावाला गेली होती. दळणवळण बंदीमुळे तिला महाराष्ट्रातून गोव्यात माझ्याकडे येणे शक्य नव्हते. घरात मी एकटाच होतो. आतापर्यंत अशी परिस्थिती माझ्यावर कधीही आली नव्हती. या परिस्थितीत माझे झालेले चिंतन, मला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. घरातील लहान कामेही करण्याची सवय नसल्याने त्यात अनेक त्रुटी रहाणे आणि त्याविषयी खंत वाटणे
‘पूर्वी मी ‘घरी एकटे रहायला काय अवघड आहे ? मी एकटा राहू शकतो’, या मोठ्या आभासी आत्मविश्वासात होतो; पण प्रत्यक्ष एकटे रहायची वेळ आल्यावर ‘असे रहाणे अवघड आहे’, हे मला समजले. मला शारीरिक कष्टांची काहीच सवय नसल्यामुळे केर काढतांना माझी कंबर दुखू लागली. ‘स्वयंपाकाचा ओटा कसा पुसावा ?’, याचीही मला जाण नसल्यामुळे ओट्यावर खरकटे रहायला लागले. दूध अनेक वेळा उतू गेले. अशा अनेक गोष्टी प्रतिदिन सहज घडत होत्या. माझ्या मनाला त्याची पुष्कळ खंत वाटत होती. मला वाटले, ‘आज चुकले, तर उद्या सुधारणा होईल. उद्या जमले नाही, तर परवा जमेल’; पण या छोट्या छोट्या गोष्टीत ८० टक्के सुधारणा होण्यातच माझे ७ दिवस गेले.
२. घरी एकटे राहिल्याने घरातील विविध कामांत स्वावलंबी होऊन ती सेवा म्हणून करता येणे
या सर्व प्रसंगांनंतर मला घरातील सर्व कामे व्यवस्थित करता येऊ लागली. घरातील प्रत्येक काम सेवा म्हणून परिपूर्ण करता येऊ लागली. दळणवळण बंदीच्या वेळी माझा रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून घरी जाण्याचा झालेला विचार ‘योग्य होता कि नव्हता ?’, हे मला ठाऊक नाही; पण ‘माझ्या वैयक्तिक साधनेच्या दृष्टीने तो विचार निर्णायक ठरला’, असे म्हणता येईल. या काही दिवसांमध्ये घरी एकटे राहिल्यावर मला घरातील पुष्कळ गोष्टी कराव्या लागल्या. या कृती वारंवार केल्यामुळे मला त्या शिकता आल्या आणि त्या परिपूर्ण करण्याची सवयही झाली. आता कितीही दिवस एकटा राहिलो, तरी पत्नीची केवळ प्रीतीच आठवेल. ‘तिने काम करण्यासाठी घरी यावे’, असे मला कधीच वाटणार नाही. हीच घरी एकटे रहावे लागण्याची फलनिष्पत्ती म्हणावी लागेल.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने घरातील कामे सेवा म्हणून करण्याच्या माध्यमातून स्वतःची शुद्रवर्णाची न झालेली साधना पूर्ण होणे
माझ्या साधनेच्या दृष्टीने विचार केल्यावर ‘आतापर्यंतच्या कालावधीमध्ये माझ्याकडून शुद्रवर्णाची साधना कधी झाली नव्हती’, असे मला वाटते. साधनेत पुढे जायचे असेल, तर परिपूर्ण आणि चारही वर्णांची साधना होणे आवश्यक आहे. ‘गुरु शिष्याला कुठल्याही गोष्टीत अर्धवट सोडत नाहीत’, याची प्रचीतीच या कालावधीत मला आली. केवढे हे श्री गुरूंचे द्रष्टेपण आणि सर्वज्ञता !
४. घरातील कामे करतांना स्वतःमध्ये अनेक गुणांची वृद्धी होणे
या काळामध्ये घरातील कर्तव्ये पार पाडण्याच्या कृतींतून श्री गुरुकृपेने माझ्यात ‘सातत्य, चिकाटी आणि परिस्थिती शांत अन् स्थिर राहून संयमाने स्वीकारणे’, हे अल्प असलेले गुण वृद्धींगत झाले. प्रतिकूल परिस्थितीचा स्वतःच्या मनावर परिणाम होऊ न देता घरातील सर्व सेवा आनंदाने अन् परिपूर्णतेने करता आल्या. गुरुकृपेने ‘घरातील उत्तरदायित्व पार पाडणे’, ही ईश्वरी सेवा आहे’, याची जाणीव झाली. या माध्यमातून श्री गुरुकृपेने ‘मी स्वतःच्या घरात रहात नसून आश्रमात रहात आहे’, अशी अनुभूतीही मला आली.
– श्री. मधुसूदन कुलकर्णी, फोंडा, गोवा.