Modi Congratulate Shehbaz Sharif : पंतप्रधान मोदी यांनी केले शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ

नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी ‘एक्स’वर शाहबाज शरीफ यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला. शरीफ यांनी ४ मार्च या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी दुसर्‍यांदा देशाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात ७२ वर्षीय शाहबाज यांना पदाची शपथ दिली.

शाहबाज शरीफ यांनी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत आघाडी सरकारचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर शरीफ यांचा ‘पी.एम्.एल्.-एन्.’ आणि ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) यांनी युती केली होती. या आघाडीकडून संयुक्त उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे करण्यात आले होते. ३३६ सदस्यांच्या सभागृहात युतीचे २०१ सदस्य निवडून आले आहेत.