पू. (सौ.) मनीषा पाठक यांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा दासनवमी, म्हणजे माघ कृष्ण नवमीला (५.३.२०२४) तिथीनुसार ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे येथील साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत. पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्यात व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी आवश्यक अशा गुणांचा अनोखा संगम आहे. त्या उच्चशिक्षित असूनही त्यांनी जीवन गुरुचरणी अर्पण केले आहे. त्यांचा गुरुकार्याचा ध्यास वाखाणण्याजोगा आहे. त्या रुग्णाईत असतांनाही पलंगावर पहुडून सेवा करतात. त्या दिवसा समष्टी सेवा आणि रात्री वैयक्तिक कामे करतात. त्यांच्यातील गुणांमुळे त्या साधकांशी लगेच जवळीक साधतात. त्यांच्यात साधक घडवण्याची तीव्र तळमळ आहे. साधकांनाही त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो. साधक त्यांच्याशी सहजतेने बोलू शकतात. पू. ताईंना सध्या पुढील शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत आहेत.
१. शारीरिक त्रास
हाडांची झीज होणे, मणक्याचा त्रास, सोरायसिस (टीप १), अल्प रक्तदाब, मधुमेह, रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त (१५ ते १६ मिलिग्रॅम/ डेसिलिटर) (टीप २) असल्याने सांध्यांना सूज असणे, मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होणे, डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खालच्या भागात बळ नसणे, आमवात, पचनाचे विकार, झोप न येणे इत्यादी.
टीप १ – ‘सोरायसिस’ हा तीव्र दाहक, दीर्घकाळ बरा न होणारा आणि संसर्गजन्य नसलेला त्वचा रोग आहे.
टीप २ – निरोगी महिलेच्या रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण प्रमाण १.५ ते ६ मिलिग्रॅम/ डेसिलिटर असते.
२. आध्यात्मिक त्रास
समष्टी सेवा करतांना पुढील त्रास होतात – पोटदुखी, कणकण वाटणे, मळमळणे, अन्न न पचणे, तोल जाणे, मागून कुणीतरी ढकलल्यासारखे वाटणे, अंगावर सूज येणे, एकदम आजारी असल्यासारखे वाटून रुग्णालयात भरती होऊन ‘सलाईन’ घ्यावे लागणे इत्यादी.
पू. ताईंना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असतांनाही त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा ढळली नाही. त्या साधकांना सहज आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करून साधकांचीही परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा दृढ करतात.
पू. (सौ.) मनीषा पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
(भाग १)
१. कु. प्राची शिंत्रे, पुणे
‘मार्च २०२२ पासून मी पुणे सेवाकेंद्रात पू. मनीषाताईंच्या समवेत राहून सेवा करत आहे. मला पू. ताईंचा सत्संग नियमित मिळतो. पू. मनीषाताईंकडून मला शिकायला मिळते आणि त्यांचे साधनेत साहाय्य होते.
१ अ. एकाच वेळी अनेक सेवा करणे : अनेक वेळा पू. ताईंचे ‘ऑनलाईन’ सत्संग आणि समन्वयाची सेवा एकाच वेळी चालू असते. त्या वेळी त्यांचे काही साधकांशी प्रत्यक्ष बोलणेही चालू असते. साधकांशी बोलत असतांनाही त्यांचे ‘ऑनलाईन’ सत्संगाकडे लक्ष असते. त्या साधकांशी बोलत असतांना अकस्मात् सत्संगातील सूत्रांनाही लगेच प्रतिसाद देतात आणि सूत्र सांगतात. ‘पू. ताई आता आमच्याशी बोलत होत्या आणि त्यांनी सत्संगातील सूत्र कधी ऐकले ?’, हे आमच्या लक्षातच येत नाही. एकाच वेळी त्या २ – ३ ठिकाणच्या गोष्टी ऐकू शकतात आणि अचूक समन्वय करू शकतात. ‘ही देवाने त्यांना दिलेली अफाट क्षमता आहे. गुरुसेवेची तीव्र तळमळ असेल, तर देव आपली क्षमता वाढवतो’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ. पू. ताईंच्या चेहर्यावर नेहमी दैवी कण दिसतात.
१ इ. ‘त्या सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवते.
१ ई. गुरुदेवांशी अनुसंधान साधण्यास शिकवणे : पू. ताई म्हणतात, ‘‘दिवसभरात अधूनमधून स्वतःला विचारायचे, ‘‘गुरुदेवांशी अनुसंधान आहे का ?’’ मी स्वतःला हा प्रश्न विचारल्यावर ‘माझे मन भरकटलेले आहे’, असे माझ्या लक्षात येते. तेव्हा मला गुरुदेवांचे स्मरण होते आणि मला स्थिर, शांत अन् अंतर्मुख व्हायला साहाय्य होते.
१ उ. पू. मनीषाताईंनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन
१ उ १. ‘साधनेत कितीही अडचणी आल्या, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण सोडून कुठेही जायचे नाही’, हे लक्षात ठेवा ! : पू. ताई मला सांगतात, ‘‘साधनाप्रवासात कितीही संघर्ष झाला, कितीही अडचणी आल्या, तरी एक लक्षात ठेव, ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहेत. त्यांचे चरण सोडून आपल्याला कुठेही भरकटायचे नाही. हे लक्षात ठेवले, तर ‘प्रसंगात न अडकता केवळ गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करणे’, एवढेच आपले ध्येय आहे, याची जाणीव सतत होऊन साधनेचे प्रयत्न योग्य दिशेने होतील.’’
१ ऊ. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या आधी काही दिवस त्यांच्या चेहर्यावरील तेज पुष्कळ वाढले होते.
१ ए. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. सोहळ्याच्या ठिकाणी अनेक दैवी कण दिसले.
२. ‘हा सोहळा रामनाथी आश्रमात होत आहे आणि गुरुदेव तिथे उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते.’
पू. (सौ.) मनीषा पाठक यांची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !१. पू. (सौ.) मनीषा पाठक यांची सेवा करतांना ईश्वराची सगुण सेवा करत असल्याचा भाव आपोआप निर्माण होणे‘मला पू. (सौ.) मनीषा पाठक यांची शारीरिक सेवा करण्याची संधी मिळते. पू. मनीषाताईंना पुष्कळ शारीरिक त्रास होत असतात, तरी त्या अखंड सेवारत असतात. पू. मनीषाताईंचे पाय चेपतांना माझे मन शांत होते आणि माझा भाव जागृत होतो. पू. मनीषाताईंची सेवा करतांना माझ्या मनात ‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत आणि माझ्यासारख्या छोट्या जिवाला संतांची, म्हणजे ईश्वराची सगुण सेवा करायला मिळत आहे’, असा भाव आपोआप निर्माण होतो. २. पू. (सौ.) मनीषाताईंची सेवा करतांना परम पूज्य गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आतून प्रार्थना होऊन मन आपोआप भावस्थितीत जाते.३. पू. (सौ.) मनीषाताईंची सेवा करतांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती३ अ. पू. (सौ.) मनीषाताईंची सेवा करतांना ‘साक्षात् श्रीकृष्णाच्या चरणांची सेवा करत आहे’, असे वाटून भाव जागृत होणे : पू. मनीषाताईंना उष्णतेचा पुष्कळ त्रास आहे. एकदा मला काश्याच्या वाटीने पू. ताईंचे पाय घासण्याची सेवा मिळाली. काश्याच्या वाटीने त्यांच्या तळपायांना घासल्यानंतर त्यांचे तळपाय पूर्ण काळे पडले. त्या वेळी ‘साक्षात् श्रीकृष्णाचे चरणच मी पहात आहे आणि श्रीकृष्णाच्या चरणांची सेवा करत आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझा भाव जागृत झाला. ३ आ. साधिका आणि कु. प्रार्थना पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना ‘पू. ताईंचे चरण, म्हणजे विठ्ठलाचे चरण आहेत’, असे जाणवणे : थोड्या वेळाने पू. मनीषाताईंची मुलगी कु. प्रार्थना पाठक तिथे आल्यावर तिलाही अशीच अनुभूती आली. ‘पू. ताईंचे चरण म्हणजे विठ्ठलाचे चरण आहेत’, असे आम्हा दोघींना जाणवले. त्या वेळी कु. प्रार्थना एका सत्संगाची सिद्धता करतांना संत तुकाराम महाराजांची कथा अभ्यासत होती. ४. पू. (सौ.) मनीषाताईंची सेवा करतांना दैवी कण दिसणेअ. एकदा मी पू. मनीषाताईंच्या तळपायांना तेल लावून काश्याच्या वाटीने घासत होते. त्या वेळी मला त्यांच्या तळपायांवर असंख्य दैवी कण दिसले. ते कण पुष्कळ चमकत होते. – एक साधिका, पुणे (२०.१.२०२४) |
२. सौ. प्रीती कुलकर्णी, पुणे
२ अ. प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे : ‘पू. मनीषाताईंनी त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण केले आहे. त्यांची प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि साधनेला धरूनच असते.
२ आ. पू. ताई नेहमी ‘अल्प वेळेत अधिक सेवा परिपूर्ण कशा करता येतील ?’, असा प्रयत्न करतात.
२ इ. तत्त्वनिष्ठ : त्या त्यांचे यजमान श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) आणि मुलगी कु. प्रार्थना (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे) यांच्याविषयी कधी भावनिक होत नाहीत. पू. ताई त्यांच्या चुका तत्त्वनिष्ठतेने सांगतात आणि त्यांना साधनेचे दृष्टीकोन सहजतेने देतात.
२ ई. स्वतःला शारीरिक त्रास होत असतांनाही इतरांचा विचार करणे आणि आनंदी असणे : एकदा प्रार्थनाला पुष्कळ ताप आला होता. आम्ही प्रार्थनाला घेऊन चिकित्सालयात गेलो. मी प्रार्थनाच्या समवेत चिकित्सालयात असतांना पू. ताईंना माझीच काळजी होती. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुला घरी जायला उशीर होत आहे. तू लवकर निघून घरी वेळेत पोच.’’ त्यांच्या बोलण्यात इतरांविषयीचे प्रेम आणि आपुलकी जाणवत होती. त्या वेळी पू. ताईंनाही शारीरिक त्रास होत होते; पण प्रार्थना रुग्णाईत असल्याने त्यांना प्रार्थनाचे करावे लागत होते, तरीही त्यांच्या चेहर्यावर त्रासाचा लवलेशही नव्हता. अन्य वेळीही पू. ताईंना कितीही तीव्र शारीरिक त्रास होत असले, तरी त्यांचा चेहरा आनंदी, उत्साही आणि प्रसन्न असतो. त्यांची वाणी मधुर असते.
२ उ. स्वतःच्या चुकांविषयी खंत वाटून त्यासाठी प्रायश्चित्त घेणे : पू. ताई त्यांच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीसाठी प्रायश्चित्त घेतात. स्वतःकडून झालेली चूक सांगत असतांना त्यांच्या बोलण्यात त्याविषयीची तीव्र खंत जाणवत असते. एकदा पू. ताई एक चूक सांगतांना म्हणाल्या, ‘‘ही चूक होण्याआधी मला मरण का आले नाही ?’’ पू. ताईंना ‘प्रत्येक सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी व्हायला हवी’, अशी तीव्र तळमळ असते. ‘मी किती न्यून पडते !’, असे त्यांना वाटत असते.
२ ऊ. पू. मनीषाताईंनी केलेले मार्गदर्शन
१. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे अन् भावस्थिती अनुभवणे’, हे महत्त्वाचे आहे.
२. ‘सेवेतून आपण स्वतः घडत आहोत ना ? आपल्यात पालट होत आहेत ना ?’, हे बघायला पाहिजे.
३. साधना म्हणजे निव्वळ आनंद आहे. तो आनंद अनुभवत रहावा.’
३. सौ. नेहा मेहता, पुणे
३ अ. साधकांना साधनेत साहाय्य करणे
३ अ १. ‘माझ्याकडून झालेल्या चुकीविषयी पू. मनीषाताईंशी बोलल्यानंतर माझ्या मनावर आलेला ताण आणि भीती उणावते.
३ अ २. पू. मनीषाताईंनी साधनेचे दृष्टीकोन दिल्यामुळे व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे : पू. ताईंनी सांगितले, ‘‘साधना होण्यासाठी संघर्ष करायला हवा. आपल्याला देव हवा आहे, तर आपण कष्ट घ्यायला हवेत. ‘आपण कुठे चुकतो ?’, हे नेहमी पहायला हवे. आयुष्यात खरेच इतकी मोठी संकटे आहेत का ? कि आपणच त्यांना मोठे करतो ? स्वतःला महत्त्व देणे आता थांबवायला हवे. आपणच आपला नामजप आणि साधना करू शकतो. साधना प्रेमाने करता यायला हवी.’’ त्यानंतर माझ्याकडून व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होऊ लागली.
३ आ. पू. मनीषाताईंनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास उणावणे : एकदा मला पुष्कळ ताप येऊन दिवसभर ग्लानी येत होती. तेव्हा मी पू. ताईंना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला नामजपादी उपाय करायला आणि दृष्ट काढायला सांगितली. मी तसे केल्यावर रात्रीपर्यंत मला ग्लानी येण्याचे प्रमाण उणावले.
३ इ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : मी पू. ताईंना काही न सांगताही त्या ‘माझ्या मनात काय चालू आहे ? कोणते विचार आहेत ?’, हे ओळखतात’, असे अनेक प्रसंगांत मला जाणवले. एकदा त्यांनी मला अकस्मात् विचारले, ‘‘तुला झोपेत फार स्वप्ने पडतात का ?’’ त्यावर मी त्यांना ‘हो’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘रात्री ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करून झोप.’’ तेव्हापासून मला स्वप्ने पडण्याचे प्रमाण उणावले आहे.
‘हे गुरुदेवा, पू. ताईंनी साधनेसाठी अपार कष्ट घेतले. ‘त्यांच्या प्रयत्नांतून आम्हाला शिकता येऊन ती सूत्रे आमच्या कृतीत येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
(क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |