26/11 Mumbai Attack : वर्ष २००६ च्या मुंबई रेल्वे बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आझम चीमा याचा पाकमध्ये मृत्यू !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – वर्ष २००६ च्या मुंबई रेल्वेगाडी साखळी बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आतंकवादी आझम चीमा याचा पाकमध्ये मृत्यू झाला आहे. फैसलाबादमध्ये ७० वर्षीय चीमाला हृदयविकाराचा झटका आला. तो लष्कर-ए-तोयबाचा गुप्तचर शाखेचा प्रमुख होता. चीमा याचा मुबंईतील २६/११ च्या आक्रमणातही हात होता.

११ जुलै २००६ या दिवशी मुंबईच्या पश्‍चिम उपनगरीय भागात रेल्वेच्या ७ डब्यांमध्ये बाँबस्फोट झाले होते. यामध्ये २०९ प्रवासी ठार झाले होते, तर ८२४ जण घायाळ झाले होते.

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईतील विविध भागांत १० आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अमेरिका आणि ब्रिटन यायंच्या नागरिकांचाही समावेश होता.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानात राहून भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांना शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद आहे. अशांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून त्यांचे खटले भारतीय न्यायालयात चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी सुरक्षायंत्रणा प्रयत्न करणार का ?