श्रीराममंदिराची स्थापना हा पाया आहे, तर हिंदु राष्ट्रात रूपांतर करणे हे आपले ध्येय ! – श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यात सहभागी मान्यवरांचा सत्कार !

मिरज – अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठापना सोहळा आपण अनुभवला, तेव्हापासून मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला होत आहे. आता तेवढ्यावरच न थांबता त्याचे हिंदु राष्ट्रात रूपांतर करणे, हे आपले ध्येय आहे, असे मनोगत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी व्यक्त केले. २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यात सहभागी झालेले ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग बिसले महाराज, तसेच श्रीमंत उर्जितसिंगराजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांचा १२ फेब्रुवारीला कागवाड येथील ‘सरकार मल्टिपर्पज हॉल’ येथे श्री. इंद्रजित समीर पटवर्धन यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पाटील हे होते.

श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. पानवळकर पुढे म्हणाले, ‘‘प्राणप्रतिष्ठापना झाली; मात्र हिंदूंना होणारा विरोध वाढला आहे. ही वेळ संघर्षाची आहे. हिंदु जनजागृती समिती गेली २२ वर्षे हा संघर्ष करत आहेत. जेथे धर्म तेथे सत्याचाच विजय नेहमी होतो.’’ या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे उत्तर कर्नाटक येथील प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख श्री. व्यंकटेश देशपांडे यांनी ‘६० वर्षांपासून विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी श्रीराममंदिरासाठी दिलेला लढा आणि हुतात्मा झालेल्या कारसैनिकांना आठवून सर्व हिंदूंच्या अथक प्रयत्नाने अयोध्येमधील श्रीराममंदिराचे काम पूर्णत्वाकडे गेले’, असे सांगितले.

श्रीमंत उर्जितसिंगराजे शितोळे सरकार म्हणाले, ‘‘प्रत्येकाने एकवेळ अवश्य श्रीराममंदिराला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घ्यावे; कारण तेथील अनुभव हा शब्दांत मांडता येत नाही.’’ ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग बिसले महाराज म्हणाले, ‘‘अयोध्येतील श्री रामलल्लाचे दर्शन झाल्यामुळे आम्ही धन्य झालो. याचा अनुभव हा ‘याची देही याची डोळा’, असा होता.

ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पाटील यांचा सन्मान अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केला. प्रास्ताविक श्री. तात्यंभट जोशी यांनी केले. सूत्रसंचालन कु. स्नेहा शशिकांत जोशी यांनी, तर सन्मानपत्राचे वाचन कु. आकांक्षा महेशकुमार जोशी यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. शशिकांत जोशी यांनी केले. या सन्मान सोहळ्यासाठी कागवाड, शेडबाळ, मंगसुळी, इंगळी, शिरगुप्पी, मांजरी, मिरज, सांगली परिसरांतील श्रीरामभक्त आणि भाविक उपस्थित होते.