हृदयमंदिरात रामरायांची स्थापना करून आध्यात्मिक जीवन जगल्यास रामराज्य अनुभवता येईल !

श्रीराम

१. ‘सर्व जिवांनी साधना करावी’, यासाठी भगवंताने अयोध्येत श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण केले असणे

‘मी माझ्या लहानपणी ‘सारे आयुष्य बाळूत्यात गेले । राम राम म्हणशील कवा ।।’ (संदर्भ – अज्ञात) ही ओवी ऐकली होती. त्याचा माझ्या लक्षात आलेला अर्थ असा, ‘मनुष्य मरेपर्यंत लहानच रहातो, म्हणजे साधना, देवाची उपासना करत नाही. मग तो रामाचे नाम कधी घेणार ? साधना कधी करणार ?’ भगवंताला सगळ्यांना साधना करायला प्रवृत्त करायचे आहे. ‘सर्वांनी श्रीरामनामामध्ये एकरूप होऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा’, यासाठी भगवंताने अयोध्येत श्रीराममंदिराच्या पुनर्निर्माणाचे नियोजन केले आहे’, असे मला वाटते.

२. मनुष्य जन्म घेतांना, जीवन जगतांना आणि मृत्यूनंतरही ‘राम’च त्याच्या समवेत असणे

श्री. शंकर नरुटे

‘मनुष्याच्या जीवनाचा आरंभ आणि अंत रामनामातच आहे’, हे सर्वांना ठाऊक आहे. जीव जन्माला आल्यानंतर पाळण्यात जिवाचे नामकरण करतांना श्रीरामाचा पाळणा म्हणतात आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्कारासाठी नेतांनाही रामनाम घेत नेले जाते. श्रीरामाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगल्यास जीवन सार्थकी लागते. काही जण त्यानुसार आचरण करून जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्नही करतात. त्यामुळे मनुष्यजन्म घेतांना, जीवन जगतांना आणि मृत्यूनंतरही ‘राम’च त्याच्या समवेत असतो.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांसमोर रामराज्याचा आदर्श ठेवून आध्यात्मिक जीवन जगायला शिकवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांसमोर रामराज्याचा आदर्श ठेवून आध्यात्मिक जीवन आचरणात आणायला शिकवले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् श्रीरामच आहेत. (टीप) त्यांच्या शिकवणीनुसार साधना केल्यास ‘पुढे आपल्याला रामराज्य बघायला मिळणार आहे’, याची साधकांना चाहूल लागली आहे. (टीप – असा साधकाचा भाव आहे.)

४. २२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेली श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे रामराज्याचा आरंभ असणे

२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे सर्व जगातच रामराज्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रामराज्याचा आरंभच आहे.

५. अयोध्येत श्रीराममंदिर झाले. आता अंतरात श्रीराममंदिर बनवून त्यात रामरायांची स्थापना करून आध्यात्मिक जीवन जगूया !

प्रभु श्रीरामाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के),सनातन आश्रम, देवद, पनवेल.