अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने…
सांगली – अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवशी सांगली आणि मिरज शहरांतील भगवे ध्वज, भगव्या पताका लावून अवघी सांगली आणि मिरज नगरी भगवी झाली होती. श्री रामभक्तांमध्ये उत्साह होता. एक आठवडाभर सांगली येथे प्रभु श्रीरामाची महती सांगणारे विविध कार्यक्रम होणार आहेत.
- भक्तांमध्ये उत्साही वातावरण !
- एक आठवडाभर सांगली येथे विविध कार्यक्रम !
सांगली शहरातील विश्रामबाग चौक, श्रीराम मंदिर चौक, टिळक चौक, गावभाग, राममंदिर चौक, गणपति पेठ, बालाजी चौक, मारुति रोड, रतनशीनगर, सराफ कट्टा, बसस्थानक परिसर येथे सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. गेल्या १५ दिवसांपासून सांगली आणि मिरज येथील रामभक्त अन् विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घरोघरी जाऊन अयोध्येतील अक्षतांचे वाटप केले होते. सांगलीसह उपनगरांमधूनही मोठा उत्साह होता.
सांगली आणि मिरज येथील अनेक इमारती अन् घरांवर रामभक्तांनी भगवे ध्वज, पताका आणि रामाचे मोठे डिजिटल फलक लावले होते. मिरज येथील ब्राह्मणपुरी, माळी गल्ली, लक्ष्मी मार्केट, सराफ कट्टा, भोसले चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, गणेश तलाव, शास्त्री चौक, नदीवेस, वखारभाग, दिंडीवेस, सुभाषनगर रस्ता येथे सर्वत्र भगवे ध्वज आणि पताका लावण्यात आल्या होत्या. मिरज शहरातून भव्य शोभायात्राही काढण्यात आली.
विश्रामबाग येथील ‘स्त्री सखी महिला मंडळा’ने श्रीराम आणि अक्षता कलशाची पूजा करून ५ वेळा रामरक्षास्तोत्राचे पठण केले. मंडळापासून एस्.टी. कॉलनीतील श्रीराम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ महिला लेझीम आणि फुगडी खेळत होत्या. यामध्ये पुरुषही फुगडी खेळली. श्रीरामनामाचा गजर चालू होता. सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, तसेच सांगली आणि मिरज येथे बर्याच ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. या मंगलसोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘संस्कार भारती सांगली जिल्हा समिती’ने ‘राम रंगी रंगले…’ या चित्र-शिल्प-रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये सांगली येथील ३० हूनही अधिक कलाकार प्रभु श्रीरामचंद्रांच्या जीवनातील अनेक प्रसंग रेखाटणार आहेत. सुंदर रांगोळी, चित्रकला आणि शिल्पकला यांचे प्रात्यक्षिक आयोजिले आहे.
प.पू. श्रीसद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम !
‘प.पू. श्रीसद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी महोत्सवनिमित्त कैवल्यधाम येथे २२ ते ३१ जानेवारी या कालावधीत विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तने, गायन आणि व्याख्यान, तसेच दीपोत्सव होणार आहे’, अशी माहिती शताब्दी पुण्यतिथी महोत्सव स्वागत समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस महाराज आणि श्री. गणेश गाडगीळ यांनी दिली. ३१ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता मंिदरावर पुष्पवृष्टी होणार असून सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव होणार आहे.