PM Modi In Pran Pratishtha : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आता आपल्याला रचायचा आहे ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्या – शेकडो वर्षांत कोट्यवधी लोकांच्या बलीदानांनंतर आपले प्रभु श्रीराम आले आहेत. ईश्‍वरी चैतन्य अनभुवण्यास येत आहे. किती सांगण्यासारखे आहे; परंतु कंठ मला ते सांगू देत नाही. माझे शरीर अजूनही स्पंदनांनी भारलेले आहे. त्या क्षणांत चित्त अजूनही लीन आहे. माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्‍वातील रामभक्तांनी घेतली असणार. आपले रामलला आता तंबूत रहाणार नाहीत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेनंतर उपस्थित निमंत्रितांसमोर दिली. शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपली, आता पुढे काय ?’ असा प्रश्‍न आहे. दैवी आत्म्यांना तसेच परतायला सांगणार का ? तर नाही. हीच वेळ योग्य आहे. पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आज रचायचा आहे. समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य आणि दिव्य भारताची निर्मिती करायची आहे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे !

१. २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा आरंभ आहे. आजपासून १ सहस्र वर्षांनंतरही आजच्या या क्षणाची चर्चा केली जाईल. ‘आपण सर्वजण हे साक्षात् पहात आहोत, अनुभवत आहोत’, ही केवढी मोठी रामकृपा आहे. आज सर्व दिशा दिव्यतेने पूर्ण आहेत.

२. मी प्रभुंची क्षमायाचना करतो. आम्ही कुठेतरी कमी पडल्याने शेकडो वर्षे आम्ही मंदिर बांधू शकलो नाही. आज मला वाटते की, प्रभु श्रीराम आपल्याला अवश्य क्षमा करतील. अनेक दशके श्रीराममंदिरासाठी कायदेशीर लढा लढावा लागला. मी न्यायपालिकेचा आभारी आहे की, तिने न्याय केला.

३. असंख्य कारसेवक, रामभक्त, साधू-संत यांचे आम्ही ऋणी आहोत. भारतीय समाजाच्या परिपक्वतेच्या बोधाचाही क्षण आहे. हा क्षण केवळ विजयाचाच नाही, तर विनयाचाही आहे.

४. ‘श्रीराममंदिर बनले, तर आग लागेल’, असे काही लोक म्हणायचे. श्रीराममंदिराची उभारणी भारतीय समाजाची शांती, धैर्य आणि समन्वय यांचे प्रतीक आहे. श्रीराममंदिर उज्ज्वल भविष्याची निर्मिती करणार आहे. राम आग नाही, तर ऊर्जा आहे. राम विवाद नाही, तर समाधान आहे.

५. आपल्याला आपल्या अंत:करणाला विस्तारावे लागेल. प्रत्येक भारतीयातील समर्पण यासाठी आवश्यक आसणार आहे. हाच तर देवापासून देश आणि रामापासून राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार आहे. ‘मी तर पुष्कळ सामान्य आहे, छोटा आहे’, असे कुणी विचार करत असेल, तर त्याला खारीची आठवण झाली पाहिजे. आपण संकल्प करूया की, आपल्या जीवनातील क्षणन्क्षण, शरिरातील कणन्कण देशासाठी, रामासाठी समर्पित केले पाहिजे. आपली पूजा समष्टीसाठी असली पाहिजे.

देवासाठी यापूर्वी तप करणारे होते छत्रपती शिवाजी महाराज ! – पू. गोविंददेव गिरि महाराज

पू. गोविंददेव गिरि महाराज

पू. गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की, पंतप्रधानांच्या मंगल हातांनी श्रीरामरायाची प्राणप्रतिष्ठा झाली. यासाठी पंतप्रधानांनी ३ दिवस नाही, तर संपूर्ण ११ दिवस तप केले. ते एकभुक्त राहिले. असा तपस्वी राष्ट्रीय प्रमुख कुणी नाही. त्यांनी नाशिक, गुरुवायूर, रामेश्‍वरम् आदी ठिकाणी अनुष्ठान केले. भारतीय संस्कृतीचा मूळ शब्द हा तप आहे ! असा तप केलेल्या राजाचे मला एकच नाव आठवते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !’, असे म्हणतांना पू. महाराजांचा भाव जागृत झाला.

सौजन्य: Zee Taas