मुंबई आणि ठाणे येथील बाजारपेठा झाल्या भगवेमय !

श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना !

श्रीराम ध्वज खरेदीसाठीचे प्रातिनिधीक छायाचित्र

श्रीरामाचे चित्र असलेल्या शाली, ध्वज आणि ‘टी-शर्ट’ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

ठाणे, १८ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या निमित्ताने देशभरात श्रीरामाचा जागर चालू झाला आहे. मुंबई, ठाणे, तसेच उपनगरांतील बाजारपेठाही भगवेमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. श्रीरामाचे चित्र असलेले उपरणे, शाली, ध्वज, टी-शर्ट, बिल्ले घेण्यासाठी किरकोळ आणि घाऊक बाजारात दिवाळीप्रमाणेच गर्दी झाली होती.

या सगळ्या वस्तूंना किरकोळ बाजारात मोठी मागणी असल्यामुळे मुंबई येथील मशीद बंदर येथे असलेल्या घाऊक दुकानांमध्ये वस्तू घेण्यासाठी गर्दी जमली होती. लालबाग मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वज, टोप्या, रस्त्यांवर लावण्यात येणारे पट्टे यांची दुकाने आहेत. येथेही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

दादर, परळ, ठाणे आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फूलबाजारातही फुले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ठाणे येथील बाजारातील काही मोठ्या दुकानदारांकडून दुकानांच्या प्रवेशद्वारावर श्रीरामाचे चित्र, तसेच अयोध्या मंदिराचे छायाचित्र रेखाटण्यात आले आहे, तर विद्युत् रोषणाई करून दुकाने सजवण्यात आली आहेत. या सोहळ्यानिमित्त काही दुकानदारांनी वस्तू खरेदीवर सवलतीही दिल्या आहेत. बाजारात ‘जय श्रीराम’, ‘राम सियाराम’ असे लिहिलेल्या साड्या, तसेच श्रीरामाचे चित्र आणि अयोध्या मंदिराचे छायाचित्र रेखाटलेले अन् ‘जय श्रीराम’ लिहिलेले टी-शर्ट, शाली, मफलर, टोपी, ध्वज हे साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध आहे. श्रीरामाचे चित्र असलेले टी-शर्ट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा आहे.