Importance Of HinduDharma : शांती आणि ज्ञान यांच्या शोधात ९० अमेरिकन नागरिक भारतात : हरिद्वारमध्ये स्वीकारणार सनातन धर्म !

९० अमेरिकन नागरिक सनातन धर्म स्वीकारणार, हरिद्वारमध्ये घेणार दीक्षा

हरिद्वार (उत्तराखंड) – काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्‍या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे. शांती आणि ज्ञान यांच्या शोधात ९० अमेरिकन नागरिक भारतात आले आहेत. हरिद्वारमध्ये ते सनातन धर्म स्वीकारणार आहेत. स्वामी वेदव्यासानंद यांच्या पुढाकाराने ते मकर संक्रांतीच्या दिवशी सनातन धर्माची दीक्षा घेणार आहेत. स्वामी वेदव्यासानंद महाराज हे विदेशात सनातन धर्म संस्कृतीचा प्रसार करतात. श्री दक्षिण काली घाट येथे निरंजन पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी कैलाशानंद गिरी महाराज त्यांना सनातन धर्माची दीक्षा देणार आहेत.

(सौजन्य : VK NEWS)

या अमेरिकन नागरिकांनी नुकतेच गंगेच्या काठावर पूजा करून माँ दक्षिण कालीचे दर्शन घेतले आणि स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले. स्वामी कैलाशानंद गिरी महाराज म्हणाले, ‘‘संपूर्ण जग सनातन धर्म संस्कृती आणि परंपरा यांनी प्रभावित होत आहे. विदेशात रहाणार्‍या लोकांना पाश्‍चात्य संस्कृतीचा त्याग करून सनातन धर्म संस्कृती शिकून घेऊन ती अंगीकारायची आहे. सनातन धर्म संस्कृतीचा जगभर प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शांती आणि ज्ञान यांच्या शोधात ९० अमेरिकन नागरिक हरिद्वारला आले आहेत.’’

स्वामी वेदव्यासानंद महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी कृष्णानंद म्हणाले की, गुरु हे ईश्‍वराचे दुसरे रूप आहे. आदरणीय गुरुदेव स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन धर्म संस्कृतीचा प्रचार अमेरिका आणि इतर देशांमध्ये होत आहे. स्वामी अवंतिकानंद ब्रह्मचारी म्हणाले की, १५ जानेवारी या दिवशी होणार्‍या दीक्षा कार्यक्रमात अनेक नामवंत संत उपस्थित रहाणार आहेत.