छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय भूखंड विक्रीचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असतांना स्वत:च्या ‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’च्या नावे अनधिकृतपणे ५० शासकीय भूखंड बळकावल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या वादग्रस्त जागेवर चालू असलेल्या ३०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम न्यायालयाच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी शासनाच्या विविध विभागांसह १० प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. ४ आठवड्यांनंतर या याचिकेची पुढील सुनावणी होणार आहे.
सिल्लोड येथील नागरिक शफिक पठाण, शकील खान साहेब खान पठाण, सुलतान पठाण आणि गणेश पेल्ली यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. सध्या या जागेवर ‘नॅशनल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल महाविद्यालय’ उभारण्यात येत आहे. ‘ही अनधिकृत खरेदी रहित करून गायरान आणि सीलिंग यांच्या भूमी शासनाने कह्यात घ्याव्यात’, अशी विनंती अधिवक्ता एन्.बी. खंदारे आणि अधिवक्ता धनंजय पाटील यांच्या वतीने उच्च न्यायालयात केली, तसेच या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशीचीही विनंती त्यांनी केली आहे.