ISRO Big Success : ‘इस्रो’ला मोठे यश : कोणत्याही प्रदूषणाविना अंतराळात निर्माण केली ऊर्जा !

‘फ्युल सेल’ तंत्रज्ञानाचे अंतराळातील ‘पी.एस्.एल्.व्ही.- सी ५८’मध्ये झाले यशस्वी परीक्षण !

बेंगळुरू (कर्नाटक) – अलीकडेच म्हणजे १ जानेवारी या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने ‘पी.एस्.एल्.व्ही.- सी ५८’चे अंतराळात प्रक्षेपण केले. त्यामध्ये केलेल्या परीक्षणात कोणत्याही प्रदूषणाविना इस्रोला ऊर्जा निर्माण करता आली. याला ‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत शुद्ध पिण्याचे पाणीही बनते. त्याचा उपयोग अंतराळात जाणार्‍या मानवाला होणार आहे. इस्रोचे हे मोठे यश आहे. याचा लाभ मानवसहित अंतराळ मोहीम असणार्‍या ‘गगनयान’ कार्यक्रमासाठी भारताला होणार आहे.

इस्रोने अंतराळात १०० वॉट श्रेणीच्या ‘पॉलीमर इलेक्ट्रोलाइट मेंब्रेन फ्यूल सेल’ या तंत्रज्ञानावर आधारित ‘पावर सिस्टम’ (ऊर्जा प्रणाली) चे यशस्वी परीक्षण केले. या परीक्षणाच्या वेळी ‘हायड्रोजन’ आणि ‘ऑक्सिजन’ या वायूंच्या साहाय्याने उच्च दाब असलेल्या एका भांड्यात १८० वॉट ऊर्जा उत्पन्न करण्यात आली. यातून पिण्याचे शुद्ध पाणीही मिळाले आणि कोणतेही प्रदूषण झाले नाही. ‘फ्यूल सेल’ तंत्रज्ञान एक विद्युत् जनित्र (जनरेटर) आहे, जे ‘इलेक्ट्रोकेमिकल’ (विद्युत् रासायनिक प्रणाली) सिद्धांतावर काम करते.

या ऊर्जेचा वाहनांमध्येही उपयोग होऊ शकणार !

‘फ्यूल सेल’ तंत्रज्ञानाच्या लाभांचा विचार करता आता वाहनांमध्येही बॅटरीच्या जागी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा विचार होत आहे. याने केवळ पारंपरिक इंजिनांना लवकरात लवकर रिचार्जच करता येईल, असे नाही, तर यातून ऊर्जानिर्मितीच्या प्रक्रियेत होणार्‍या प्रदूषणावर ताबा मिळवता येणार आहे.