Gold Smuggling Pakistani Terriorists : पाकच्या आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांवरून भारतात सोन्याची तस्करी !

महसूल गुप्तचर संचालनालयाची माहिती

महसूल गुप्तचर संचालनालय

पणजी, १ जानेवारी (वार्ता.) : पाकिस्तानच्या आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांचा भारतात सोन्याची तस्करी करण्यासाठी वापर केला जात आहे आणि यामधून मिळणार्‍या मिळकतीचा देशभरात भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापर होत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डी.आर्.आय.) यांना मिळाली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाला संशय आहे की, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिदिन सोन्याची तस्करी केली जाते. यामागे पाकिस्तानी आतंकवाद्यांचा हात आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता वाढवण्यात आली आहे, तसेच माहिती मिळवण्याचे स्रोत अधिक भक्कम करण्यात आले आहेत. भारतात सोन्याची तस्करी करून पुढे सोने विकून त्यातून मिळणारा पैशांचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जातो. महसूल गुप्तचर संचालनालयाने मोपा विमानतळावर मागील ३ मासांत सुमारे १० कोटी रुपयांचे सोने कह्यात घेतले आहे. तस्करी करणारे गोव्यातील मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळांचा वापर करतात.

सोने यंत्रामध्ये लपवले होते !

डिसेंबर २०२३ मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने मोपा विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणी दोघांना कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे २ कोटी २० लाख रुपये किमतीचे सोने कह्यात घेण्यात आले. कह्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी  नितेश सहानी याची बॅग पुष्कळ जड होती आणि त्यामध्ये दार उघडण्यासाठी वापरले जाणारे यंत्र होते अन् या यंत्रामध्ये सोने लपवलेले होते.