Diwali : नरकचतुर्दशी

Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Narakchaturdashi

आश्विन कृष्‍ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’ असे म्‍हणतात. नरकासुर नावाच्‍या क्रूरकर्मा राक्षसाच्‍या अंतःपुरात १६ सहस्र स्‍त्रिया बंदीवासात होत्‍या. पृथ्‍वीवरच्‍या सर्व राजांना तो अतोनात छळायचा. श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध करण्‍याचे ठरवले. त्‍याच्‍या शिरच्‍छेदाचे दायित्‍व सत्‍यभामेने घेतले. घनघोर युद्धात सत्‍यभामेने नरकासुराला कंठस्नान घातले. बंदीवासातील १६ सहस्र स्‍त्रिया मुक्‍त झाल्‍या. त्‍या दिवशी घरोघरी दीपोत्‍सव आणि रांगोळ्‍या काढून आनंदोत्‍सव साजरा झाला. त्‍या दिवसापासून नरकचतुर्दशीला दीपोत्‍सवाची प्रथा चालू झाली.

श्रीकृष्‍णाने आणि सत्‍यभामेने नरकासुराचा संहार केला. नरकासुराने मृत्‍यूसमयी श्रीकृष्‍णाकडे वर मागितला, ‘आजच्‍या तिथीला सूर्योदयापूर्वी जो मंगलस्नान करील, त्‍याला नरकाची पीडा होऊ नये. माझा हा मृत्‍यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा करावा.’ कृष्‍णाने ‘तथास्‍तु’ म्‍हटले. त्‍यामुळे आश्विन कृष्‍ण चतुर्दशी ही ‘नरकचतुर्दशी’ या नावाने ओळखली जाते.

या दिवशी लोक पहाटे उठतात. दिवे लावतात. तेल, उटणे लावून अंघोळ करतात. कोकणात अंघोळीनंतर तुळशीसमोर कारीट फोडतात. ते कडू कारीट नरकासुराचे प्रतीक असते. पायाने कारीट ठेचतांना ‘गोविंदा, गोविंदा’, असा नामघोष करायचा. कारीटाच्‍या रसाचा कपाळी टिळा लावायचा. या दिवशी  तिखट पोहे, गोड पोहे, तळलेले पोहे, दडपे पोहे, दही पोहे केले जातात. एकमेकांना आग्रहाने घरी बोलावून पोहे आणि दिवाळीचा फराळ खाऊ घातला जातो. घरोघरी फराळ पोचवला जातो.

– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (साभार : ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)