जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता काहीशी खराब झाली आहे. ४ दिवसांपासून त्यांनी उपोषण चालू केल्यानंतर त्यांनी अन्न आणि पाणी घेतलेले नाही. जरांगे यांनी वैद्यकीय उपचारास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे उपोषणस्थळी असणार्या आधुनिक वैद्यांची चिंता वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, सलाईन लावलं, अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचं अपडेट pic.twitter.com/Q5E8ccfCG0
— Mumbai Tak (@mumbaitak) September 6, 2023
कुणाचा जीव गेल्यास सरकार उत्तरदायी !
सरकारने आंदोलनाची नोंद न घेतल्याने मनोज जरांगे यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी आंदोलनाच्या दुसर्या टप्प्याची घोषणा केली आहे. २९ ऑक्टोबरपासून गावागावात ‘आमरण उपोषण चालू करा’, असे आवाहन मराठा समाजाला करून ‘कुणाचा जीव गेल्यास सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणीही त्यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने आता आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी. सरकारने २८ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत उत्तर द्यावे. आता हा लढा आपल्याला आणखी तीव्र करावा लागणार आहे. या आंदोलनाचीही सरकारने २ दिवसांत नोंद घेतली नाही, तर ३१ ऑक्टोबर या दिवशी आंदोलनाच्या तिसर्या टप्प्याची घोषणा करू.