संयुक्त राष्ट्रे कोणताही वाद शांततेने सोडवण्यास सक्षम नाहीत ! – भारत

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सध्या खुली चर्चा चालू आहे. यामध्ये ‘संवादातून शांतता’ आणि ‘विवादांचे शांततापूर्ण निराकरण’ या विषयांवर चर्चा आयोजित केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी या चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. तसेच ‘संयुक्त राष्ट्रे कोणताही वाद शांततेने सोडवण्यास सक्षम नाहीत’, असेही त्या म्हणाल्या.

कंबोज म्हणाल्या, ‘‘पाकिस्तानने पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेच्या व्यासपिठाचा गैरवापर केला आहे. त्यांच्या टिपण्या निराधार असतात आणि म्हणून त्या पूर्णपणे फोटाळल्या जातात. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश असून भारताचे अविभाज्य भाग आहेत. कुठलाही वाद सोडवण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय चर्चा अधिक प्रभावी ठरली आहे.’’