…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्‍याच वेळा भयंकर असतात. निसर्ग या माध्यमातून स्वतःची शक्ती दाखवून देत असतो आणि आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची सूचना करत असतो, जिच्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. सोप्या शब्दांत सांगायचे, तर हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

तुर्कीयेमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. कॅनडामध्ये जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला असून तिथे तापमान एवढे वाढले आहे की, तेथील एका तलावात १०० ‘डॉल्फिन’ मासे मृतावस्थेत सापडले. या सगळ्याची कारणे हवामान पालटाकडे निर्देश करत आहेत; पण हे सगळे एका दिवसात घडले का ? याचा विचार केला गेला पाहिजे.

नैसर्गिक आपत्तींचा करावा लागणारा सामना !

१. हवामान पालटांच्या धोरणांची तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता !

ब्राझीलमध्ये आज दुष्काळ पडत असला, तरीही मागच्या १-२ वर्षांमध्ये तेथील जंगलाला भयंकर आगी लागलेल्या आहेत. पूर आणि भूकंप सतत कुठे ना कुठे घडतच आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये तुर्कीयेत आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता, ज्यात ४ सहस्रांपेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. हे असे चक्र थोड्या फार प्रमाणात जगभर चालूच आहे. आज जगभरातील १८० देश हवामान पालटांचा सामना करत आहेत. या वाढलेल्या घटनांमुळे जगभरात हवामान पालटांशी निगडित विविध परिषदांचे आयोजन केले जाते. आपल्याकडे झालेल्या ‘जी-२०’ परिषदेतही (‘जी-२०’, म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) हवामान पालटावर चर्चा झाली; पण आज संपूर्ण जगच कार्यवाही करायला न्यून पडतांना दिसत आहे. त्याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

कु. अन्नदा मराठे

२. हिंदु संस्कृतीत पर्यावरणाविषयी सांगितलेले महत्त्व

या पालटांचा प्रारंभ भारतच करू शकतो; कारण आपल्याकडे फार पूर्वीपासून निसर्गपूजा सांगितलेली आहे; मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच आपला भारतही विविध हवामान पालटांना सामोरा जात आहे. अवेळी पडणारा पाऊस, ठिकठिकाणी येणारे पूर, हिमालयीन भागात होणारी भूस्खलने ही सगळी याचीच उदाहरणे आहेत; पण असे असले, तरीही आपणच यातून मार्ग काढू शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये पर्यावरणाला अतिशय महत्त्व दिले गेले आहे. पर्यावरणाविषयी कृतज्ञता बाळगायला आणि त्याचे रक्षण करायला सांगितलेले आहे. ‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः।’ (अथर्ववेद, काण्ड १२, सूक्त १, खण्ड १२) म्हणजे ‘पृथ्वी माझी माता आहे, मी तिचा पुत्र आहे’, असे हिंदु संस्कृती सांगते; पण आपण मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत आहोत, तिला ओरबाडण्याचा प्रयत्न करत आहोत; पण आईला त्रास देऊन कुणीही कधी सुखी होऊ शकत नाही, हे आपण विसरत आहोत. आपण तिची काळजी घेतलीच पाहिजे.

३. पर्यावरण आणि सण यांविषयी जागरूकता हवी !

नाप्सु मूत्रं पुरीषं वा ष्ठीवनं वा समुत्सृजेत्।
अमेध्यालिप्तमन्यद् वा लोहितं वा विषाणि वा।। – मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक ५६

अर्थ : पाण्यामध्ये मल-मूत्र टाकू नये, थुंकू नये, तसेच कचरा, रक्त किंवा विषारी पदार्थ पाण्यात सोडू नयेत.

असे मार्गदर्शन आपल्याला आपल्या धर्माने केलेले आहे, म्हणजेच पर्यावरण संतुलनाचा अभ्यास आपल्या ऋषिमुनींनी फार पूर्वीच केलेला होता, असे आपल्याला दिसते. म्हणूनच आपण नदीला आई मानून तिची पूजा करतो. वटपौर्णिमेसारख्या सणांना आपण वृक्षपूजा करतो. नागपंचमी, बैलपोळा या दिवशी प्राण्यांची पूजा करतो. या सर्वांविषयी कृतज्ञताभाव ठेवल्यामुळे पर्यावरणाविषयी आपोआपच आपण जागरूक बनतो; पण आज आपली या सणांविषयीची जागरूकता न्यून व्हायला लागली आहे. साहजिकच आपण पर्यावरणापासून दूर चाललो आहोत. निसर्गापासून दूर जाऊन आपण आज कदाचित् सुख मिळवत असूही; पण याचे दूरगामी परिणाम निश्चितच चांगले होणार नाहीत.

४. पर्यावरणाचा समतोल न ढासळण्यासाठी उपाययोजना प्रारंभ करण्याची आवश्यकता !

काही ठिकाणी देवराई असून ‘देवाचे जंगल’ म्हणून त्यांचे संवर्धन झाले आहे, तसेच अनेक आदिवासी आजही एखादे झाड तोडतांना त्याची क्षमा मागतात अन् बहुतेक वेळा ते त्याचा पाहिजे तेवढाच भाग काढून घेतात. या सगळ्या गोष्टींमागचे कारण पर्यावरणाचा समतोल ढासळू नये, हे आहे; पण विकासाच्या नावाखाली लागलेली हाव याचा विचारच करू देत नाही.

असे असले, तरी आता मात्र आपल्याला याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पर्यावरण संतुलनाचा प्रारंभ आपण स्वतःपासून केला पाहिजे. शीतकपाट (फ्रिज), वातानुकूलित यंत्र (एसी) यांसारख्या उपकरणांचा वापर न्यून करणे, वर्षातून किमान २ झाडे लावून त्याची वर्षभर काळजी घेणे, कापडी पिशवीचा वापर करणे, जवळपास जातांना सायकलचा वापर करणे किंवा पायी जाणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रारंभ स्वतःपासून केला, तर पालट नक्कीच होईल; कारण निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे, आपण ते ऐकायला हवे.

– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.