गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील मद्यतस्करीचे मूळ काणकोण येथे !

गुजरात पोलिसांनी न्यायालयात दिली माहिती

मद्यतस्करीचे मूळ गोव्यात ?

पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) :  गुजरात पोलिसांनी हल्लीच काणकोण येथील रहिवासी लिगोरियो डिसोझा याचा सहभाग असलेले गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधील मद्यतस्करीचे जाळे उघडकीस आणले आहे. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी भाचाऊ, कच, गुजरात येथील अतिरिक्त सत्र आणि जिल्हा न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार लिगोरियो डिसोझा हा आंतरराज्य मद्यतस्करीमध्ये विदेशी मद्य पुरवणारा एकमेव पुरवठादार आहे. गुजरात न्यायालयाचे न्यायाधीश पी.टी. पटेल यांनी लिगोरियो डिसोझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

सविस्तर वृत्त असे की,

हल्लीच गुजरात पोलिसांनी गुजरात येथे समखियाली राष्ट्रीय महामार्गावर ४५ लाख ७० सहस्र रुपये किमतीचे अवैध मद्य कह्यात घेतले. ‘एम्.एच्. ११ ए.एल्. ३७१४’ या क्रमांकाच्या ट्रकमधून हे मद्य नेले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचा चालक आणि वाहक, तसेच ट्रक कह्यात घेतला. पोलिसांनी कह्यात घेतलेल्या संशयितांनी या वेळी मद्याचा पुरवठा लिगोरियो डिसोझा यांनी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अन्वेषण केले असता त्यांना ‘गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये मद्याची तस्करी चालते आणि यामध्ये लिगोरियो डिसोझा हा मद्याचा पुरवठा करतो’, असे लक्षात आले.

गुजरात पोलिसांनी लिगोरियो डिसोझा याच्या विरोधात मद्यप्रतिबंधक कायद्याचे कलम ६५ (अ), ६५ (इ), ८१, ८३, ९८ (२) आणि ११६ (ब) या जाचक कलमांतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी बाजू मांडतांना लिगोरियो डिसोझा याचा या तस्करीमध्ये सहभाग नसल्याचे त्याच्या अधिवक्त्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयात मद्यतस्करीची माहिती देतांना गुजरात सरकारचे प्रतिनिधित्व करणारे विशेष सरकारी अधिवक्ता म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपुरवठा करणारा लिगोरियो डिसोझा हा एकमेव पुरवठादार आहे. यापूर्वीही त्याच्या विरोधात अशाच स्वरूपात तक्रारी आलेल्या आहेत आणि यामुळे लिगोरियो डिसोझा याला अटकपूर्व जामीन देऊ नये.’’ न्यायालयाने या प्रकरणी लिगोरियो डिसोझा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याच्याकडून कह्यात घेतलेला मोठ्या प्रमाणावरील मद्याचा साठा लक्षात घेऊन लिगोरियो डिसोझा याला अटकपूर्व जामीन नाकारला.