सांगलीच्‍या विकासासाठी २ सहस्र ६५० कोटी रुपयांचा निधी आणला ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

आमदार सुधीर गाडगीळ

सांगली – राज्‍यशासनाच्‍या विविध योजनांमधून गेल्‍या ४ वर्षांत सांगली विधानसभा मतदारसंघासाठी २ सहस्र ६५० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. यातील बहुसंख्‍य कामे पूर्ण झाली असून प्रलंबित कामे दिवाळीनंतर चालू होतील. या कामांमुळे दिवाळीनंतर सांगलीचे रूप पालटलेले दिसेल. सांगली-पेठ रस्‍त्‍याच्‍या कामाची निविदा निश्‍चित झाली आहे. या महामार्गासाठी ८६० कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. या रस्‍त्‍याचे काम जानेवारी २०१४ चालू होईल, अशी माहिती भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी भाजपचे सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्‍हाध्‍यक्ष प्रकाश ढंग, सांगली महापालिकेचे माजी स्‍थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी उपस्‍थित होते.

आमदार सुधीर गाडगीळ पुढे म्‍हणाले, ‘‘मला सांगली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्‍व करण्‍याची संधी सलग दुसर्‍यांदा मिळाली. विरोधक माझ्‍यावर कितीही आरोप करत असले, तरी मी कामांमधूनच त्‍या आरोपांना प्रत्‍युत्तर देतो. गेल्‍या ४ वर्षांत आरोग्‍यविषयक कामांसाठी ३७० कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. कुपवाड भुयारी गटार योजनेसाठी २५३ कोटी रुपये, हनुमाननगर येथे अत्‍याधुनिक नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपयांचा निधी संमत करण्‍यात आला आहे. त्रिकोणी बागेत हुतात्‍मा स्‍मारक उभारण्‍यात आले असून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी १५० कोटी रुपये संमत केले आहेत.’’