नवी देहली येथील केंद्रीय गृहमंत्रालयाच्‍या बैठकीत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्‍वाही !

राज्‍यातील नक्षलवाद संपवण्‍यात आम्‍ही लवकरच यशस्‍वी होऊ !

मुंबई –  महाराष्‍ट्रातील नक्षलग्रस्‍त भागात मागील वर्षभरापासून विविध विकास योजना परिणामकारकपणे राबवल्‍या जात आहेत. त्‍यामुळे गडचिरोलीसारख्‍या भागातील  नक्षलवाद पूर्णपणे संपवण्‍यात आम्‍ही लवकरच यशस्‍वी होऊ, असा विश्‍वास मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त केला. नवी देहली येथील विज्ञानभवन येथे केंद्रीय गृहमंत्रालयाने डाव्‍या विचारसरणीमुळे निर्माण झालेला उग्रवाद रोखण्‍याविषयी ६ ऑक्‍टोबर या दिवशी आयोजित केलेल्‍या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्‍य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्‍थित होते.

इंटरनेटच्‍या माध्‍यमातून समाजमाध्‍यमांद्वारे शहरी नक्षलवाद फोफावत आहे. त्‍याला रोखण्‍यासाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करणे आवश्‍यक आहे. नक्षलवाद्यांना प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये पाठवले जातात. हा पैशांचा व्‍यवहार थांबवण्‍यासाठी अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणा आणि वित्तीय गुप्‍तचर विभाग यांनी एक संयुक्‍त गट सिद्ध करून सखोल अन्‍वेषण करावे, अशी विनंती या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

नक्षल प्रभावित भागात रेल्‍वेचे जाळे पसरवण्‍याची आवश्‍यकता आहे. गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणा या सीमावर्ती भागात रेल्‍वेचे जाळे विकसित केल्‍यास मोठा लाभ होईल. माओवादग्रस्‍त भागातील ९ एकलव्‍य मॉडेल शाळांपैकी ३ शाळा चालू आहेत. नक्षलवादाच्‍या विरोधातील कारवाईमध्‍ये घायाळ झालेल्‍या पोलिसांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळणे आवश्‍यक आहे; मात्र या भागात रात्रीच्‍या वेळेत हेलिकॉप्‍टर उतरवण्‍याला अनुमती नाही. लष्‍करी कारवाई किंवा बचावाची कार्यवाही यांसाठी रात्रीच्‍या वेळेत हेलिकॉप्‍टर उतरवण्‍याची अनुमती मिळावी. नक्षलवाद्यांची पकड खिळखिळी करण्‍यासाठी पुढील २ वर्षांत अधिक तीव्रतेने कारवाया करण्‍यात येतील, ही सूत्रे एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत मांडली.

नक्षलवाद्यांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार !

जी.एन्. साईबाबा याच्‍या सुटकेच्‍या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयातील राज्‍यशासनाचे अपील सर्वोच्‍च न्‍यायालयाने मान्‍य केले. मर्दानटोला येथे मिलिंद तेलतुंबडेला चकमकीत मारण्‍यात आले. सद्य:स्‍थितीत महाराष्‍ट्रात सक्रीय नक्षलवादी गटांपैकी ४९ टक्‍के छत्तीसगडमध्‍ये आहेत. महाराष्‍ट्र-छत्तीसगड सीमेवर ४ संयुक्‍त ‘टास्‍क फोर्स कॅम्‍प’ सिद्ध आहेत. नक्षलवाद्यांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी गृह मंत्रालयाच्‍या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करण्‍यात येत आहेत.

नक्षलग्रस्‍त भागात पोलीसबळ वाढवणार !

नक्षलवादाच्‍या विरोधात लढण्‍यासाठी ‘स्‍पेशल टास्‍क फोर्स’, ‘स्‍पेशल इंटेलिजेंस ब्‍युरो’, ‘फोर्टिफाइड पोलीस ठाण्‍यासाठी विशेष पायाभूत सुविधा वाढवणे ही कामे चालू आहेत. यासाठी ६१ कोटी ३५ लाख रुपये व्‍यय करण्‍यात आला आहे. मार्च २०२५ ही कामे पूर्ण होतील. नवीन पोलीस ठाण्‍यांसाठी २५ अधिकारी आणि ५०० कर्मचारी संमत करण्‍यात येणार आहेत, अशी माहिती मुख्‍यमंत्री शिंदे यांनी दिली.